Speech Of Governor : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केलेल्या अभिभाषणावर विधानसभेमध्ये मंगळवारी (17 डिसेंबर) चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यपाल हे एका पक्षाचे सदस्य असतात असे विधान केले. भास्कर जाधव यांच्या या विधानानंतर विधानसभेमध्ये गोंधळाला सुरुवात झाली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जाधव यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सभागृहामध्ये भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर हरकत घेतली. त्यानंतर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी देखील भास्कर जाधव यांचे संपूर्ण भाषण रेकॉर्ड वरून काढून टाकण्याची मागणी केली. राज्यपालांच्या अभिभाषणावर भास्कर जाधव हे बोललेले नाही. ते केवळ सरकार कसे स्थापन झाले? यावर बोलत आहेत. त्यामुळे त्यांचे संपूर्ण भाषण करण्यात यावे अशी मागणी जयस्वाल यांनी केली.
वाक्य काढले
विधानसभेतील नियमांची तपासणी केल्यानंतर विधानसभेच्या तालिका अध्यक्षांनी भास्कर जाधव यांचे शब्द रेकॉर्डवरून काढून टाकले. केवळ राज्यपालांच्या अभिभाषणावर भास्कर जाधव यांनी बोलावं अशी सूचना देखील अध्यक्षांनी केली. मात्र त्यानंतरही भास्कर जाधव हे अभिजात मराठीच्या भाषेवर बोलायला लागले. त्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये तुम्ही मराठीवर किती प्रेम केले हे आम्ही बघितले आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली.
आशिष जयस्वाल आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहामध्ये आक्रमक भूमिका घेतली. राज्यपालांवर बोलल्यानंतर भास्कर जाधव यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी आपण माफी मागणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे विधानसभेमध्ये बराच वेळपर्यंत वाद-विवाद सुरू होता. विधानसभेतील आमदारांनी केवळ राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलावं, अशी सूचना वारंवार अध्यक्षांनी केली.
सरकारवर आक्षेप
आमदार भास्कर जाधव यांनी सरकारच्या स्थापनेवर आक्षेप घेतला. राज्यपालांनी ठरवण्यापूर्वीच काही नेत्यांनी शपथविधीचा मुहूर्त ठरवून टाकला होता. त्याच्यानंतर भाजपच्या गटनेत्याची निवड झाली. घटनेची निवड झाली नसताना शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झालीच कशी, हा प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. यावरून देखील भाजपच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. सभागृहामधील चर्चा सरकार कसे स्थापन झाले त्यासंदर्भातील नाही. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आहे, असा आक्षेप घेण्यात आला.
विधानसभेतील ही चर्चा प्रचंड वादळी ठरली. त्यामुळे भास्कर जाधव यांचे भाषण सुरू असताना सत्ताधारी आमदारांनी त्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भास्कर जाधव यांनी अध्यक्षांकडे संरक्षणाची मागणी केली. आपल्याला बोलू दिलं जात नसेल तर ही सगळी प्रक्रिया काय कामाची? असा सवालही आमदार भास्कर जाधव यांनी केला.