Winter Assembly Session : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना राज्यपाल पद मिळू शकते, असे विधान भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी केले आहे. विधान भवन परिसरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महायुतीच्या सरकारमध्ये सर्वच विभागाला आणि सर्वच समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे.
अलीकडेच नागपूरमध्ये राजभवनात कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा शपथविधी समारोह पार पडला. शपथविधी सोहळ्यानंतर महायुती मधील तीनही पक्षांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. तानाजी सावंत हे अधिवेशन सोडून पुण्याला निघून गेले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे देखील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात दिसले नाहीत. छगन भुजबळ यांनी सुद्धा नागपूरमधून काढता पाय घेत नाशिक गाठले आहे.
विश्वसनीय माहिती?
राज्यभरातील नेत्यांमध्ये कॅबिनेट मंत्रि मंडळ विस्तारानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी उफाळून आली. भाजप समर्थनाच्या जोरावर विधानसभेमध्ये निवडून गेलेले रवी राणा हे देखील नागपूरमधून निघून गेले आहेत. याशिवाय तानाजी सावंत हेदेखील पुण्याकडे रवाना झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळ यांचे काय करायचे हा मोठा प्रश्न अजित पवार यांच्यापुढे आहे.
छगन भुजबळ यांच्या नाराजीबद्दल भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत. त्यामुळे देशातील एका राज्यात त्यांना राज्यपालपद देण्याची योजना असावी, असे देशमुख म्हणाले. लवकरच या संदर्भातील चित्र स्पष्ट होईल असे देखील देशमुख म्हणाले. त्यामुळे आमदार अशीच देशमुख यांच्या जवळ आलेली माहिती विश्वसनीय आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अजितदादा गायब
अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे गायब आहेत. अजित पवार हे दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांनी अजित पवार हे नागपूर मध्येच असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अजित पवार समोर का येत नाहीत? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सर्वाधिक नाराजी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. त्या तुलनेने भारतीय जनता पार्टी मधील नाराजीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाच नाराज आमदारांना सांभाळावे लागणार आहे.
हिवाळी अधिवेशन सुरू असताना सुरू असलेल्या या राजकीय घडामोडीमुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. छगन भुजबळ यांचा समावेश न झाल्याने ओबीसी समाजाकडून नाराजी व्यक्त होत आहे. छगन भुजबळ हे राज्यातील माळी समाजाचे एकमेव नेते आहेत. त्यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली आहे. मात्र आपण राज्यसभेवर जाणार नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
आताच विधानसभा निवडणूक झाली. आपल्याला विजयी करण्यासाठी चहा त्यांनी दिवस रात्र एक केला. त्यामुळे लगेच राजीनामा देणे हा त्यांच्यासोबत विश्वासघात होईल असे भुजबळ नाशिक येथे बोलताना म्हणाले. त्यामुळे आमदार आशिष देशमुख यांनी केलेल्या डाव्यामध्ये किती तथ्य आहे, यावर विचार सुरू आहे.