Shiv Sena : शिवसेनेचे उर्वरित आमदारदेखील मंत्रिपदासाठी पात्र आहेत. मात्र 11 मंत्री करत असताना नेत्यांचा कस लागतो. मी चांगलं काम केलं नाही, तर दोन ते तीन महिन्यात आमचे नेते एकनाथ शिंदे आमचेही मंत्रिपद काढून घेऊ शकतात, ही भीती आमच्या मनात आहे. म्हणून आम्हा मंत्र्यांनादेखील जनतेला अभिप्रेत असलेलं काम करायला हवं, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.
मंगळवारी (17 डिसेंबर) उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खाते वाटपाबाबत विचारले असता ते म्हणाले, लवकरात लवकर खातेवाटप होईल. सगळे मंत्री महाराष्ट्राची सेवा करतील. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांचा तो पक्षांतर्गत विषय आहे. त्यांच्याबद्दल मी वक्तव्य करणे योग्य नाही. त्याबद्दल अजितदादा व राष्ट्रवादीचे नेते बोलतील, असे ते छगन भुजबळ यांच्या नाराजी बद्दल म्हणाले.
नाराजी स्वाभाविक
एखाद्याला मंत्रिपद मिळाले नाही, तर नाराजी होऊ शकते. मात्र शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही कुटुंब म्हणून काम करतो आहे. अनेकांची नाराजी दूर करण्यासाठी आम्ही चर्चा केली आहे. अनेकांशी चर्चा सुरू आहे. तानाजी सावंत, विजय शिवतारे आमच्यासाठी जेष्ठ आहेत. लवकरात लवकर एकनाथ शिंदे त्यांची समजूत काढतील. आमदार अमोल मिटकरी काय बोलतात, त्यावर मला भाष्य करायचं नाही. अमोल मिटकरी यांचे सूत्र ‘स्ट्राँग’ असतील म्हणून त्यावर काही चर्चा करायची नाही.
जयंत पाटील मोठे नेते आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल बोलावं एवढा मोठा मी नाही. त्यांना यायचं असेल तर ते नेतेमंडळीशी चर्चा करतील. माझ्या सारख्या सोबत आणि आमदार अमोल मिटकरींसोबत कशाला चर्चा करतील, असा प्रश्न सामंत यांनी उपस्थित केला.
मार्गदर्शनाचा अधिकार
उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आमदारांना बोलावून त्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यांच्या मार्गदर्शनावर मी कशाला टीका करू. तो लोकशाहीचा भाग आहे. अधिवेशनात सोमवारी पुरवणी मागण्यांच्या यादीत 1 हजार 400 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील. मंत्रिपदाचे वाटप झाल्यावर एका पक्षापुरता मर्यादित विचार न करता महायुती म्हणून विचार केला. आम्ही सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केला आहे, असं सामंत यांनी स्पष्ट केलं.
खाते वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस सांगितलं होतं. हे बरोबर आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस संपला. मंगळवारचा दिवस संपायचा आहे. त्यामुळे केव्हाही खाते वाटप होईल, ही अपेक्षा आपण सर्वांनी ठेवायला हवी. आपण कोणत्याही खात्यासाठी काम करत नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व आम्ही काम करत आहोत. काम करीत असताना ते जी कोणती जबाबदारी आमच्यावर देतील ते आम्ही स्वीकारणार. एकनाथ शिंदे यांना गृह खाते मिळणार का, असे विचारले असता, मोठं खातं आणि मोठं पद आपल्या नेत्याला मिळावं, ही प्रत्येक कार्यकर्त्यांची भावना असते. त्यामुळे माझीदेखील भावना तीच आहे, असं त्यांनी सांगितलं.
सामान्य कार्यकर्ता
आपण एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी एकटाच शिंदे यांच्या जवळचा आहे, असं नाही. आमचे सगळेच आमदार शिंदे यांचे ‘राइट हॅन्ड’ आहेत. एखांद काम सांगितलं तर प्रामाणिकपणे करण्याचा माझा स्वभाव आहे. आम्ही कुटुंब म्हणून काम करतो. आमचे कुटुंबप्रमुख एकनाथ शिंदे आहेत, असेही उदय सामंत यांनी सांगितले.