महाराष्ट्र

Shiv Sena : नागपुरात ठाकरेंची ‘मशाल’ विझण्याकडे

Uddhav Thackeray Group : पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात दाखल

Change In Party : एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे 40 आमदार व मंत्री महाविकास आघाडीमधून बाहेर पडले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता बोटावर मोजण्याइतके नेते उद्धव ठाकरे यांच्या सेनेत शिल्लक राहिले आहे. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ठाकरेंच्या ‘मशाल’ची धग कमी होत चालली आहे. अशातच राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असताना ठाकरेंच्या सेनेतील अनेक पदाधिकारी शिंदेंच्या सेनेत दाखल झाले आहेत.

शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत या सगळ्यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेवत आपण त्यांच्यासोबत येत असल्याचं या सगळ्यांनी सांगितलं. शिवसेना पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, नागपूरचे शिवसेना संपर्क प्रमुख मंगेश काशीकर यांच्या मार्गदर्शनात हा प्रवेश घेण्यात आला. यावेळी शिवसेना प्रवक्ता व आमदार डॉ. मनिषा कायंदे यांच्या विशेष उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला.

अनेकांचा प्रवेश

शिवसेनेचे नागपूर शहर प्रमुख समीर शिंदे व महिला सेना जिल्हाप्रमुख मनिषा पापडकर यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेशाचा हा सोहळा पार पडला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील अनेक महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे गटातील विभाग प्रमुख विशाल कोरके, शहर संघटक निलिमा शास्त्री, विभाग संघटका उज्ज्वला उंमरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Mahayuti 2.0 : नवीन चेहऱ्यांचा प्रस्थापितांना दे धक्का

पदाधिकाऱ्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे नागपुरात शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या कार्याला आणखी ताकद मिळाली आहे. त्यामुळं उपराजधानीत शिवसेनेची घोडदौड आणखी वेगानं होणार आहे. पक्ष प्रवेशाच्या वेळी शिवसेनेचे विधानसभा संघटक राजेश रेवतकर, उपशहर प्रमुख राहुल पांडे, उपशहर प्रमुख कमलाकर सावरकर, विभाग प्रमुख रुपेश ठाकरे, विभाग प्रमुख प्रवीण कोहाड, विधानसभा संघटक सुधीर कोमलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यापासून सातत्यानं ठाकरे यांना सोडून शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या शिवसैनिकांचा ओघ कायमच आहे.

पक्ष प्रवेशाचा हा क्रम सुरू असतानाच शिवसेनेचे शहर प्रमुख समीर शिंदे यांना नागपुरात मोठा बदल घडवून आणण्यात यश मिळालं आहे. नागपूरमध्ये समीर शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालत असल्यानंच आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत खऱ्या शिवसेनेत कायम राहिल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. भविष्यातही नागपूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढलेली दिसेल, असं समीर शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!