Mahayuti 2.0 : बडनेरामध्ये भाजपच्या पाठिंब्याने विजय झालेले आमदार रवी राणा आता नाराज झाले आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे रवी राणा नाराज झाले आहेत. त्यामुळे शपथविधी आटोपल्यानंतर तातडीने रवी राणा आहे अमरावती कडे रवाना झाले आहे. एकीकडे अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच रवी राणा हे आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करायला अमरावतीकडे रवाना झाले आहेत. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर तातडीने माजी खासदार नवनीत राणा या देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या होत्या.
मुख्यमंत्री झाल्यानंतर आमदार रवी राणा हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने संपर्कात होते. रवी राणा किंवा नवनीत राणा यांना कॅबिनेटमध्ये मंत्री पद मिळावे, अशी अपेक्षा होती. रवी राणा यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी अमरावतीमध्ये रवी राणा हे कॅबिनेट मंत्री होणार अशा आशयाचे फलकही लावले होते. अशी फलकबाजी लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील करण्यात आली होती. एक्झिट पोल सर्वेक्षणाचा निष्कर्ष जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा या खासदार झाल्याचे अभिनंदन करणारे फलक अमरावतीमध्ये लागले होते. अशाच आशयाचे फलक यंदाही अमरावतीत लागले. या दोन्ही वेळी राणा यांचा पोपट झाला आहे.
अतिउत्साह नडला
रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सातत्याने अति उत्साहीपणा नडत आहे. खासदारकी मिळण्यापूर्वीच रवी राणा यांच्या विजयाचे फलक अमरावतीमध्ये लागले. मात्र निवडणूक निकालात त्या पराभूत झाल्या. यंदाही राणा यांच्या सांगण्यावरून कॅबिनेट मंत्री पदाचे फलक अमरावतीमध्ये लागले. त्यामुळे यंदाही त्यांना तोंडघशी पडावे लागले. युद्ध, राजकारण आणि खेळामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत अंतिम विजयाची घोषणा होत नाही, तोपर्यंत हुरळून जाणे हे अपरिपक्वतेचे लक्षण असते. राणा दांपत्य नेमकी हीच गोष्ट वारंवार करीत आहेत.
राणा दांपत्यावर सातत्याने चमकोगिरीचा आरोप होतो. पक्ष आणि निष्ठा बदलणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीमधील प्रत्येकाला नाराज करत भारतीय जनता पार्टीने नवनीत राणा यांना पक्षात घेतले. मात्र अमरावतीमध्ये प्रत्येक नेत्याशी पंगा घेणे राणा यांना भोवले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही राणा यांनी स्वतःच्या विजयासाठी आणि आपल्या राजकीय शत्रूंच्या पराभवासाठी काम केले. त्यावेळी आपण महायुतीच्या विरोधात काम करीत आहोत, याचे भान राणा यांनी ठेवले नाही.
नवनीत राणा आणि रवी राणा यांना अमरावती जिल्ह्यातून सगळ्याच राजकीय नेत्यांचा विरोध आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी सुलभा खोडके यांना उमेदवारी दिली. त्यावेळी रवी राणा यांनी फडके यांच्या विरोधात वक्तव्य केले. हे वक्तव्य करताना सुलभा खोडके या महायुतीच्या उमेदवार आहेत, याचा सोयीस्कर विसर राणा यांना पडला. त्यामुळे मंत्रीपद देताना महायुतीमधूनही राणा यांच्या नावाला विरोध झाला. त्यामुळे ऐनवेळी भारतीय जनता पार्टीने राणा यांचा पत्ता कापल्याची माहिती आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला आता राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडवावे लागणार आहे. अन्यथा राजकारणामध्ये त्यांचे तळ्यातमळ्यात कधीही थांबणार नाही.