Ramtek : रामटेक लोकसभा जिंकणाऱ्या नेत्यांनी केंद्रात मंत्रिपदं मिळवली. पी.व्ही. नरसिंहराव तर पुढे देशाचे पंतप्रधानही झाले. पण रामटेक विधानसभा मात्र मंत्रिपदाच्या बाबतीत कायम उपेक्षित राहिली. जवळपास 42 वर्षांनंतर रामटेकच्या वाट्याला मंत्रिपद आले, पण तेही राज्यमंत्रिपदाच्या रुपानेच. अर्थात महाविकास आघाडी सरकारच्या काळातच मंत्रिपदाची अपेक्षा असलेले ॲड. आशीष जयस्वाल आता राज्यमंत्रिपदावरही समाधानी असतील, यात शंका नाही.
रामटेक विधानसभा मतदारसंघात पाचवेळा विजय मिळविणारे आशीष जयस्वाल एकमेव नेते आहेत. यापूर्वी पांडुरंग हजारे, गुंडेराव महाजन या नेत्यांना सलग दोनवेळा विधानसभा जिंकता आली आहे. पण, आशीष जयस्वाल यांनी सलग तीन आणि त्यानंतर सलग दोन असा पाचवेळा रामटेक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. 2014 मध्ये निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेना युती तुटली. त्यामुळे मोदी लाटेत भाजपचे मल्लिकार्जून रेड्डी विजयी झाले आणि आशीष जयस्वाल पराभूत झाले. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा आशीष जयस्वाल यांनी कमबॅक केले.
2019 मध्ये भाजप-शिवसेना एकत्र लढले पण, निकालानंतर युती तुटली. मुख्यमंत्रिपदावरून वाद ताणला गेला आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये आपल्या वाट्याला किमान राज्यमंत्रिपद येईल, अशी अपेक्षा आशीष जयस्वाल यांना होती. मात्र, त्यांच्या वाट्याला प्रतिक्षाच आली. त्यानंतर शिवसेनेत फुट पडली आणि जयस्वाल यांनी शिंदेंसोबत जाणे पसंत केले. तरीही नव्या महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. 2024 मध्ये जयस्वाल यांनी पुन्हा रामटेक विधानसभा जिंकली आणि आता त्यांना राज्यमंत्रिपदाचे गिफ्ट मिळाले आहे.
1982 मध्ये किंमतकर झाले मंत्री
रामटेक विधानसभा मतदारसंघातून ॲड. मधुकरराव किंमतकर यांनी 1982 मध्ये विजय मिळवला होता. त्यावर्षी काँग्रेस सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. ते अर्थ व नियोजन, कामगार, विधी व न्याय विभागाचे राज्यमंत्री होते. पुढे त्यांच्याकडे विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची जबाबदारी आली. ते म्हाडाच्या अध्यक्षपदी देखील होते. आता जयस्वाल यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Mahayuti शेवटच्या क्षणी डावलले; भोंडेकरांनी उधळला नाराजीचा ‘भंडारा’!
दोघेही वकील
रामटेकमधून आतापर्यंत फक्त दोघांचीच राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. यात पहिले ॲड. मधुकरराव किंमतकर आणि आता ॲड. आशीष जयस्वाल आहेत. विशेष म्हणजे दोघेही वकील आहेत आणि दोघांनीही उमेदीच्या काळात वकिली देखील केली आहे. त्यामुळे रामटेकच्या वाट्याला दुसऱ्यांदा वकील मंत्री आला आहे, असे म्हणायला हरकत नाही.