Oath Ceremony : राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे नाराज झाले आहेत. शपथविधी सोहळ्याच्या काही मिनिटपूर्वी नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पदांचा राजीनामा दिला. शिवसेनेतील नाराजीनाट्याला भोंडेकर यांच्यापासून सुरुवात झाली. या संदर्भात शिवसेनाप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र शपथविधी सोहळ्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी पक्षातील नाराजीबाबत भाष्य केले.
राजभवनातून बाहेर पडण्यापूर्वी उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सामंत म्हणाले, आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह पक्षातील सर्वच नाराज व्यक्तींसोबत एकनाथ शिंदे हे संवाद साधणार आहेत. तीन पक्षांचे सरकार म्हटल्यावर काही प्रमाणामध्ये राजी-नाराजी निर्माण होणे स्वाभाविक आहे. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून काही आमदार नाराज होणे हे देखील स्वाभाविक आहे. अशा सर्व नाराज आमदारांसोबत एकनाथ शिंदे चर्चा करणार आहेत, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे काय?
शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील नाराजी उफाळून आली आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळालेले नाही. त्यामुळे छगन भुजबळ रुसले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत मिळाव्याला त्यांनी दांडी मारली. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही नाराजी दूर करण्याचे आव्हान एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापुढे आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आमदार नरेंद्र भोंडेकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर छगन भुजबळ देखील अजित पवार यांच्यासोबत एकत्र आले होते. मात्र त्यांना यावेळी मंत्रिपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील नाराजी आहे. मात्र या नाराजीची तीव्रता शिवसेनेतील नाराजीपेक्षा कमी आहे. त्यामुळे शपथविधीनंतर एकनाथ शिंदे यांना सर्वात प्रथम नाराज आमदारांची बोळवंण करावी लागणार आहे. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांच्या नावाला आमदारांचा विरोध होता. त्यापैकी संजय राठोड आणि गुलाबराव पाटील हे मंत्री झाले आहेत. केवळ दीपक केसरकर कॅबिनेटमधून बाहेर आहेत. त्यांना सलग दोनदा एकनाथ शिंदे यांनी भेट नाकारली होती. त्यामुळे केसरकर हे मंत्री होणार नाहीत, हे निश्चित मानले जात होते.
शपथविधी सोहळ्यापूर्वी सुरू झालेल्या नाटकीय घडामोडीनंतर अखेर काही आमदार मंत्री झाले आहेत. काही आमदारांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. त्यामुळे रेसच्या बाहेर राहिलेल्या आमदारांना टिकवून ठेवण्याचे आव्हान एकनाथ शिंदे यांना पेलावे लागणार आहे. या आव्हानांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसे सामोरे जातात ही त्यांची परीक्षा ठरणार आहे.