या लेखातील मतं ही लेखकाची आहेत. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असे नाही.
Mahayuti 2.0 : सक्रीय राजकारणात आमदार म्हणून काम करताना अनेकांना आपणही मंत्री व्हावे असे वाटते. सलग दोन-तीन वेळेस निवडून आल्यावर ही इच्छा अधिक प्रबळ होत जाते. आपण या पदासाठी पात्र आहोत, असेही त्यांना वाटते. काही जण त्या दृष्टीने कामाला लागतात. आपल्या हितचिंतक व्यक्तींतर्फे जमेल तसे प्रयत्न करुन बघतात. आपल्या मनातील इच्छा पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्नही करतात.
आता महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे शपथविधी पार पडले आहेत. रविवारी (15 डिसेंबर) मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. अनेकांनी आपली मंत्री पदावर वर्णी लागावी म्हणून प्रयत्न केले. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी मात्र असे कुठलेही प्रयत्न केले नाहीत. न मागताही मंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. पक्षाच्या प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे पक्ष नेतृत्वाचे लक्ष असते.
निष्ठेचे फळ
प्रामाणिक कार्यकर्त्यांचा योग्य वेळी सन्मान होतोच. आकाश फुंडकर यांना त्यांच्या कार्याची पावती मंत्री रुपाने मिळाली आहे.भाजपचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत दिवंगत नेते पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांचे आकाश फुंडकर हे चिरंजीव आहेत.भाऊसाहेब हयात असतानाच तिकीट मिळाले होते. त्यावेळी भाऊसाहेब मंत्री होते. नंतर भाऊसाहेब यांचे निधन झाले. 2019 मध्ये निवडणुकीत त्यांना निवडून येण्यासाठी भावनिक आधार मिळाला होता.
मिळालेल्या संधीचे सोने केले. अनेक विकास कामे पूर्ण केली. जलयुक्त शिवार योजनेला राज्य पातळीवर पोहचवून मोलाचे कार्य केले. आजही अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारास खामगाव विधानसभा मतदारसंघातून भरघोस मताधिक्य मिळाले होते. पक्ष नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून कार्य करणे हा त्यांच्यात असलेला विशेष गुण आहे.
आजवर पक्षाने जी जबाबदारी त्यांचेवर सोपवली ती त्यांनी तत्परतेने पार पाडली आहे. स्वतः साठी कोणत्याही पदाची मागणी त्यांनी कधीच केली नाही. तुमच्या मंत्री पदासाठी प्रयत्न करा, असे त्यांच्या हितचिंतकांनी सुचविले. आकाश फुंडकर यांनी मात्र त्यास नम्रपणे नकार दिला. मंत्री होण्याची मनिषा बाळगणाऱ्यांची नावे मात्र त्यांनी मित्र प्रेमापोटी श्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न केला.
आत्मीयतेचे संबंध
मतदारसंघातील जनतेसोबत त्यांचे आत्मीयतेचे संबंध आहेत. जनतेच्या समस्या आपल्या परीने सोडविण्यासाठी ते मनापासून प्रयत्न करतात. पक्ष बळकट करण्यासोबतच पक्षाचे ऐक्य टिकवण्यासाठी ते सतत प्रयत्न करतात. विशेष म्हणजे आजपर्यंत कुठल्याही गटबाजीच्या, फोडाफोडीच्या राजकारणात ते कधीच पडलेले नाहीत. लोकप्रतिनिधी म्हणून सोपवलेली जबाबदारी पार पाडणे यालाच ते आपले प्रथम कर्तव्य मानतात. जनतेच्या अतूट विश्वासावर ते चांगले मताधिक्य घेऊन तिसऱ्यांदा विजयी झाले. चांगल्या कार्याचे फळ त्यांना मिळाले आहे.
गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे आणि भाऊसाहेब फुंडकर यांनी यांनी पक्ष वाढीसाठी मनापासून प्रयत्न केले. भारतीय जनता पक्षाविषयी जनतेच्या मनात विश्वास जागवला. बहुजन समाजाला पक्षासोबत जोडले. तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले.अनेक समस्यांचा सामना केला. आव्हाने पेलली. सत्तेत आल्यावर पक्षानेही त्यांच्या
कार्याचा सन्मान केला. गोपीनाथ मुंडे पक्ष बदल करण्याच्या द्विधा मनस्थितीत असताना भाऊसाहेब फुंडकर व एकनाथ खडसे यांनी त्यांना रोखले होते. पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा वसा आकाश फुंडकर यांना घरातूनच मिळाला आहे
अखंड पुण्याई
आकाश फुंडकर यांच्या पाठीशी वडिलांच्या कार्याची पुण्याई आहेच. वडिलांच्या जागेवरच त्यांची लोकप्रतिनिधी म्हणून कारकीर्द सुरू झाली. समाजसेवेचा तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांची वाटचाल सुरू आहे. सर्वांच्या सहकार्याने मतदार संघाचा विकास करणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. विदर्भातून मंत्री पदासाठी अनेक जण इच्छुक होते. काहींनी त्यासाठी जबरदस्त फिल्डिंग लावली होती. तथापी ही सर्व मंडळी स्वतःहून मागणारी होती.
अकोल्यातील एका भाऊंचे नाव तर आघाडीवर होते. गटबाजी आणि पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका असल्याने त्यांचे नाव वगळण्यात आल्याचे कळते. अमरावती पदवीधर मतदारसंघात याच कारवायांमुळे डॉ. रणजित पाटील यांचा पराभव झाला होता. अकोला पश्चिमच्या निवडणुकीत पक्षातील अंतर्गत कलहाचा फटका बसला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले होते. ‘मैं भूलता नहीं..’ आणि खरोखरच त्यांचे मित्र डॉ. रणजित पाटील यांचा पराभव ते विसरलेले नाहीत.
मंत्री पदासाठी झोळ्या घेऊन फीरणारे अलगद बाजूला पडले आणि न मागताही आकाश फु़ंडकर यांना मंत्री होण्याची संधी मिळाली. दस्तूरखुद्द पंतप्रधानाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. आकाश फुंडकर यांना मिळालेली संधी पंतप्रधानांची प्रेमळ थाप मानायला हवी. देवेंद्र फडणवीस यांची चाणाक्ष आणि पारखी नजर म्हणजे काय याचा अनुभव त्यात दिसून येतो.