Mahayuti 2.0 : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये निम्मे चेहरे नवीन राहणार आहेत. सुमारे 42 मंत्र्यांना नागपूर येथील राजभावनात शपथ दिली जाणार आहे. यापैकी अनेक आमदार पहिल्यांदाच मंत्री होणार आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा वरचष्मा दिसत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपल्या ज्येष्ठ मंत्र्यांवरील भार कमी केला आहे.
ज्येष्ठ माजी मंत्र्यांना पक्ष संघटनेत सक्रिय करण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यातून पंकज भोयर यांना प्रथमच मंत्री पदाची संधी देण्यात आली आहे. खामगावमध्ये आकाश फुंडकर यांना देखील मंत्री पदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा खामगावला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून अशोक उईके यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. उईके हे यापूर्वी देखील मंत्रिमंडळामध्ये होते. शिवसेनेकडून आशिष जयस्वाल यांना मंत्रिपद मिळालं आहे.
अनुशेष दूर होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः नागपूरचे असल्याने त्यांनी विदर्भाला झुकतं माप दिल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून यवतमाळ जिल्ह्यातील इंद्रनील नाईक यांना देखील संधी मिळाली आहे. नवीन चेहरे आणि नव्या दमाच्या आमदारांना संधी देऊन महायुती सरकार एक वेगळा पायंडा महाराष्ट्रामध्ये पाडत आहे. संभाव्य सर्वच मंत्र्यांना आतापर्यंत तीनही पक्षांच्या नेत्यांनी फोन केले आहे. हे सर्वच संभाव्य मंत्री नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. नागपूर येथील राजभावनात कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. 33 वर्षांनंतर नागपूर येथे मंत्र्यांच्या शपथविधी होत आहे. या शपथविधीनंतर नव्या मंत्र्यांसह देवेंद्र फडणवीस कामाला लागणार आहेत. सर्व नवीन मंत्र्यांना अडीच वर्षांपर्यंत संधी मिळेल, असा फार्मूला ठरल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळात बदल होईल, असे संकेत दिसत आहेत.
ज्येष्ठांना कोणती जबाबदारी?
कॅबिनेट मंत्रिमंडळातून महायुतीने काही ज्येष्ठ नेत्यांना दूर ठेवले आहे. तीनही पक्षातील या ज्येष्ठ नेत्यांना आता कोणते काम देण्यात येणार आहे? याची उत्सुकता सर्वांना आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आणखी ताकदीने महायुती सरकार काम करणार असल्याचे संकेत आहेत. अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळामध्ये कोणत्या नावांचा समावेश होतो, याची उत्सुकता देखील राजकीय वर्तुळात आहे. परिणामी महायुती मधील तीनही पक्षातील ज्येष्ठ नेते सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. मात्र भाजप सोडली तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थोडी अस्वस्थता दिसत आहे.