Administrative Measures : महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्म मधील पहिलं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून उपराजधानी नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही शपथविधी अद्याप झालेला नाही. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्ये मंत्री पदावरून अद्यापही ओढाताण कायम आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी शपथविधी होणार का? याबद्दल संभ्रम आहे.
16 डिसेंबरपूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर नागपुरात हा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यंदा सुमारे आठ हजार सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त नागपूर शहरांमध्ये तैनात राहणार आहे. दरवर्षी अधिवेशन काळामध्ये सर्वसाधारणपणे साडेसात ते आठ हजार पोलिसांचे मनुष्यबळ नागपूरमध्ये तैनात केले जाते. यांना देखील ही संख्या कायम राहणार आहे.
राज्यभरातून मनुष्यबळ
अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी संपूर्ण राज्यातून पोलीस बळ नागपूर येथे पोहोचणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील अधिवेशन काळात तैनात राहणार आहेत. दरवर्षी फोर्स वन आणि दहशतवाद विरोधी पथकांची नेमणूक देखील नागपुरात केली जाते. ही व्यवस्था देखील नेहमीप्रमाणे कायम असेल. मुख्यमंत्र्यांसह सर्वच अति महत्त्वाचे व्यक्ती पाच दिवसांसाठी नागपूर मुक्कामी येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने राज्यभरातून अनेक श्वान पथकांना देखील नागपूरमध्ये हजर राहावे लागणार आहे. या पथकांच्या माध्यमातून स्फोटक पदार्थांचा शोध घेतला जातो.
सरकार नवीन असल्याने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा मोर्चांची संख्या कमी असेल अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. असे असले तरी दरवर्षीप्रमाणे झिरो माइल चौकातील मोर्चा पॉईंटवर नाकाबंदी कायम राहणार आहे. गणेश टेकडीकडून ‘झिरो माइल’ चौकापर्यंत कठडे उभारण्यात येणार आहेत. सिताबर्डी चौकातून झिरो माइल चौकाकडे येणारी वाहतूक देखील वळविण्यात येणार आहे. महाराज बागेकडून आकाशवाणी चौकाकडे येणाऱ्या मार्गावरही बंदोबस्त असेल.
पोलीस नवे नाहीत
नागपूर महापालिकेजवळ देखील रस्ता बंद केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरी परिसरामध्ये यंदा पूर्वीपेक्षा जास्त बंदोबस्त असेल. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रथमच नागपुरात येत आहेत. त्यामुळे त्यांना भेटणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे रामगिरी परिसरातील बंदोबस्तासाठी खास उपाय केले जात आहेत. त्या खालोखालची सुरक्षा व्यवस्था उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देवगिरी आणि अजित पवार यांच्या विजयगड येथे केली जात आहे.
सरकार नवीन असल्याने अधिवेशन पाच दिवसाचे होणार आहे. मात्र पोलिसांना अधिवेशन हे नवीन नसल्याने पूर्णवेळ अधिवेशनाप्रमाणेच या पाच दिवसांची तयारी देखील पोलीस विभागांने ठेवली आहे. अधिवेशनाबाबत वेळापत्रक जाहीर होताच पोलीस आणि प्रशासन आणखी वेगाने पावलं टाकणार आहेत. सध्या नागपूर महापालिका आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागपूर येथील रस्त्यांची दुरुस्ती सुरू आहे. मंत्री आणि अधिकारी राहणार असलेल्या परिसरामध्ये पथदिवे आणि प्रकाशाची व्यवस्था केली जात आहे. प्रशासन आणि राजकीय व्यक्तींना सध्या एकच वेध लागले आहे ते म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार आणि हिवाळी अधिवेशनाचे.