National Security : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने अमरावती आणि भिवंडीमध्ये छापा घालत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानातील एका संस्थेच्या सतत संपर्कात असल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी देखील केंद्रीय तपास यंत्रणांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे छापा घालून एका तरुणाला ताब्यात घेतली होते. या तरुणाची अनेक तास कसून चौकशी केल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याची मुक्तता केली होती.
भिवंडीतील खोणी खाडीपार ग्रामपंचायत आणि अमरावती शहरातील छाया नगर भागात ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून सातत्याने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर पाळत ठेवली जाते. भिवंडी आणि अमरावतीतून सातत्याने पाकिस्तानमध्ये संपर्क साधण्यात येत होता. त्यामुळे तपास यंत्रणांना चौकशी करणे गरजेचे वाटले. त्यानुसार एकाच वेळी भिवंडी आणि अमरावती मध्ये बुधवारी छापा घालण्यात आला.
राजापेठमध्ये चौकशी
एनआयएच्या टीमने अमरावती शहरातून एका तरुणाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्या तरुणाला घेऊन एनआयएची टीम पोलीस ठाण्यात आली. अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये या युवकाची सध्या चौकशी सुरू आहे. हा तरुण पाकिस्तानमधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा एनआयएला संशय आहे. बुधवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास शहरातून या तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. तरुण पाकिस्तानी संघटनेच्या कसा संपर्कात आला? अमरावती किंवा भारतात त्यांच्यासोबत कोण आहे? तो कोणत्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला का? या बाबत चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडून करण्यात येत आहे.
नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छायानगर परिसरातील एका घरावर एनआयएच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने काल मध्यरात्रीनंतर छापा घातला. मुसाईद असे या युवकाचे नाव आहे. देशविघातक कारवाया करणाऱ्या संघटनांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून ऑक्टोबर महिन्यात एनआयएने राज्यात छत्रपती संभाजी नगर, जालना आणि मालेगाव येथील काही तरूणांना ताब्यात घेतले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एनआयएच्या पथकाने अचलपूर येथील अकबरी चौक परिसरातील एका घरात पोहचून युवकाला ताब्यात घेतले होते. या युवकाच्या हालचालींवर राष्ट्रीय तपास संस्था लक्ष ठेवून होती. एनआयएने अमरावतीत यापुर्वीही अनेकवेळा कारवाई केली आहे.
Nitin Gadkari : भर लोकसभेत म्हणाले, लाजेने मान खाली घालावी लागते
औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांची 21 जून 2022 रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला होता. या हत्येचे षडयंत्र, संघटनांचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संबंध याच्या संपूर्ण तपासाची जबाबदारी ही एनआयए कडे सोपविण्यात आली होती. उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना एनआयएच्या ताब्यात देण्यात आले होते. हे संपूर्ण प्रकरण एनआयए हाताळत आहे. उमेश कोल्हे यांची हत्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठीच झाल्याचा दावा एनआयएनं आपल्या आरोपपत्रातून केला आहे.
उमेश कोल्हे हत्याकांडात 137 पानी आरोपपत्रात एकूण 11 जणांवर आरोप लावण्यात आले आहेत. अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ काही सोशल मीडिया पोस्ट शेअर केल्या होत्या. ज्याच्या रागातूनच उमेश कोल्हेंची हत्या तबलिगी जमातीच्या कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी केल्याचा आरोप आहे. या हत्याकांडात एनआयएकडून मुसफिक अहमद आणि अब्दुल अरबाज या दोघांना अटक करण्यात आली होती.