महाऔष्णिक केंद्रातील आठ आणि नऊ क्रमांकाचे संच प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शहरातील वातावरण प्रदूषित होत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना गरजेच्या आहेत. भाजपचे नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक निर्देश दिलेत.
जोरगेवार यांनी महाजेनको आणि सीएसटीपीएसच्या (CSTPS Pollution) अधिकाऱ्यांना सात दिवसांत उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मुंबई येथे जोरगेवार यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. यावेळी महाजेनकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, संचालक (ऑपरेशन्स) संजय मरुडकर, कार्यकारी संचालक नितीन वाघ, आयटी विभागाचे कार्यकारी संचालक नितीन चंदूरकर, तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा व सीएसटीपीएसचे मुख्य अभियंता कुमरवार यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आमदार जोरगेवार यांनी प्रदूषणावर ठोस उपाययोजना करण्याचा आग्रह धरला.
चंद्रपूरसारख्या औद्योगिक शहरात प्रदूषण नियंत्रणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु, महाऔष्णिक केंद्रातील आठ आणि नऊ क्रमांकाचे संच हवेत धूर, राख व घातक कण सोडत आहेत. त्यामुळे परिसरातील हवेचा दर्जा खालावत आहे. या स्थितीमुळे स्थानिक रहिवाशांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. आमदार जोरगेवार यांनी संचांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा अचूक अभ्यास करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यासंदर्भात कृती आराखडा तयार करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
तात्पूरते उपाय नकोत
प्रदूषणामुळे चंद्रपूर शहरातील स्थिती चिंताजनक झाली आहे. जंगलांच्या सान्निध्यात असूनही वाढते प्रदूषण गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी नियमित पाण्याचा फवारा मारणे, राखेचे योग्य व्यवस्थापन, आणि इतर पर्यावरणीय उपाययोजना अंमलात आणणे गरजेचे आहे. याबाबतीत कुठलेही तात्पूरते उपाय न करता कायमस्वरुपी उपाययोजनांचा विचार करावा, असेही आमदार जोरगेवार म्हणाले.
Gondia : मुख्यमंत्री जल संरक्षण योजनेत हलगर्जीपणा; अभियंता निलंबित
प्रदूषणाची कारणे आणि परिणाम
चंद्रपूरसारखे औद्योगिक शहर प्रदूषणाच्या दृष्टीने भारतातील सर्वाधिक संकटग्रस्त भागांपैकी एक मानले जाते. महाऔष्णिक केंद्रातील आठ आणि नऊ क्रमांकाचे संच प्रदूषणाचा एक प्रमुख स्रोत आहेत. या संचांमधून हवेत मोठ्या प्रमाणावर राख, धूर, आणि घातक कण पसरत आहेत. परिसरातील पर्यावरणीय संतुलन बिघडत आहे, याकडेही अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.
जंगल, नद्यांचेही आरोग्य धोक्यात
प्रदूषणामुळे नागरिकांसह जंगल आणि नद्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. धूर व राखेमुळे चंद्रपूरच्या जंगलांवर आणि वनस्पतींवर प्रतिकूल परिणाम होत आहेत. नजीकच्या वर्धा नदीच्या जलस्त्रावावरही महाऔष्णिक केंद्रातून येणाऱ्या औद्योगिक कचऱ्याचा परिणाम होत असल्याची नोंद घेण्यात आली आहे. याशिवाय महाऔष्णिक केंद्राच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दमा, फुफ्फुसांचे विकार, त्वचारोग यांसारख्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अभ्यासानुसार, चंद्रपूर परिसरात हृदयविकार आणि श्वसनाशी संबंधित आजारांचे प्रमाण महाराष्ट्रातील इतर भागांच्या तुलनेत जास्त आहे.