या लेखातील मतं लेखकाची आहेत. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असं नाही.
Maharashtra Government : कोणताही गोष्ट मोफत किंवा सवलतीच्या दरात मिळाली तर ती प्रत्येकाला हवीहवीशी वाटते स्वाभाविक आहे. कुठे काय स्वस्त मिळते याचा शोध घेणारे कमी नाहीत. अमुक ठिकाणी वस्तू खरेदी केली तर बाजार भावापेक्षा स्वस्त मिळते. पाच हजाराच्या खरेदीवर पाच सातशे रुपये सहज वाचतात, अशी मौखिक जाहिरात करणारे कमी नाहीत. घराजवळचे दुकान सोडून डी मार्ट किंवा मोठ्या मॉलमध्ये वाढणारी गर्दी याच कारणामुळे होते हे सत्य लपून राहिलेले नाही.
महिला वर्ग तर साध्या गोष्टींच्या खरेदीसाठी चोखंदळ असतात.दुकानदारासोबत घासाघीस करून त्याला भंडावून सोडणाऱ्या महिला सर्वत्र दिसतात. पुरुष वर्गाला खरेदी करणे जमत नाही, ते महाग वस्तू खरेदी करतात असा घट्ट गैरसमज महिला वर्गांनी जोपासला असतो. कोणत्याही सेलमध्ये जाऊन भरमसाठ खरेदी करणे हा तर त्यांचा छंदच मानावा लागेल.
स्वस्तात मिळणारी वस्तू दर्जेदार किंवा टिकावू आहे की नाही, याचा फारसा विचार त्या करत नाहीत. आता आपल्या फायद्यासाठी सरकारने कोणत्या योजना सुरू केल्या आहेत. त्यांचा आपल्याला कसा लाभ मिळेल याचा शोध माता भगिनी घेताना दिसतात. लोकप्रिय ठरलेली लाडकी बहिण योजना त्यांच्या साठी वरदान ठरली.
योजनेचे यश
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण योजनेने महायुतीला भरभरून यश मिळवून दिले. राज्यातील बहुसंख्य भगिनींना या योजनेचा लाभ मिळत आहे. योजना सुरू झाली. सुरुवातीला फारशी शहानिशा न करता अनेक महिलांचे अर्ज मंजूर झाले. माता भगिनींचे मत आपल्याला मिळावे हा सरकारचा सुप्त उद्देश लपून राहिला नाही.महिला मतदारांनी महायुती सरकारला भरघोस पाठिंबा दिला.विजयात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. या योजनेत लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. आता त्यात वाढ करण्यात येणार आहे.ही रक्कम आता 2 हजार 100 इतकी करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
सरकारने निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत खुबीने या योजनेचा वापर केला. महिला वर्गाची हमखास मते मिळवणे त्यामुळे सहज शक्य झाले. लोकसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीकडे जनतेचा कौल झुकला होता. त्याला शह देण्यासाठीच महायुतीने अनेक थेट लाभ देणाऱ्या योजना सुरू केल्या. महिलांच्या खात्यात विनासायास थेट रक्कम जमा होऊ लागली. महिला खुश झाल्या. आता मात्र त्यातील काही भगिनी वर्गाचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. आगामी तीन महिन्यांत या योजनेची नव्याने छाननी होणार आहे.
निकषात बदल
पात्रतेचे निकष पुन्हा तपासले जाणार आहेत. चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचे अर्ज बाद केले जाणार आहेत. महायुती सरकारच्या शपथविधी समारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिण योजना या पुढंही सुरू राहिल असे वचन दिले. आर्थिक नियोजनात सुसूत्रता आल्यानंतर योजनेचा पुढील हप्ता दिला जाईल, असेही सांगितले.
काही महिला निकषात बसत नाहीत. अशा महिलसा या योजनेचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहेत. शासनाकडे या बाबतीत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अर्जांची नव्याने छाननी केली जाईल. पात्र भगिनींना पुढील हप्ता मिळेल. अपात्र अर्ज वगळले जातील असेही त्यांनी सांगितले.
दहा लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या तसेच घरी चारचाकी वाहन असणाऱ्या काही महिला या योजनेच्या लाभार्थीं असल्याच्या तक्रारीही प्राप्त होत आहेत. काही लाडक्या बहिणींनी चुकीची माहिती दिली आहे. खोटे उत्पन्न दाखविले आहे. लग्न होऊन सासरी गेलेल्या काही लाडक्या बहिणी माहेरच्या नावावर योजनेचा लाभ घेत आहेत.
योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांची चौकशी करून निर्णय घेतला जाणार आहे. योजनेतील नियमबाह्य अर्ज बाद केले जातील. किमान 10 ते 15 टक्के अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान 35 ते 50 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून बाद केले जाणार आहे.
आता फेरपरताळणी
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या हा योजनेचा हेतू होता. कुटुंबाला मदतीचा हात मिळावा हा देखील योजनेचा मूळ उद्देश आहे. खऱ्या गरजवतांना मदत ही त्यामागची प्रांजळ भावना आहे. अनेक राज्यांनी या आधीच ही योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रात तर ही योजना विधानसभा निवडणुकीला कलाटणी देणारी ठरली.
लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी झालेली गर्दी लक्षवेधी होती. सुरुवातीला अर्ज मंजूर करताना फारशी काळजी घेण्यात आली नाही. आता नवीन सरकार स्थापन झाले आहे. लाडकी बहिण योजनेच्या अर्जाची पडताळणी करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
चुकीचा लाभ
सरकार विविध घटकांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे हितासाठी काही योजना राबवीते. खऱ्या गरजवंताना मदत मिळावी. यासाठी सरकार आपले कर्तव्य बजावते. या योजनांचा लाभ मिळावा म्हणून काहीजण चुकीच्या मार्गांचा अवलंब करून योजनेचे लाभार्थी होतात. अनुदान मिळणाऱ्या बऱ्याच योजनांत असे चुकीचे लाभार्थी असतात.
केवळ थेट आर्थिक लाभ मिळतो म्हणून अनेक सधन महिला, लाडक्या बहिणी या योजनेचा कोणताही विचार न करता लाभ घेत आहेत. ज्यांच्या जवळ सर्व काही आहे, त्यांनी उगाच लाभार्थ्यांच्या रांगेत उभे राहणे हा निव्वळ स्वार्थीपणा आहे.स्वतःशी प्रामाणिक राहणारी व्यक्ती कधीच चुकीचे पाऊल उचलत नाही. गरजवंताच्या हक्काचे अट्टाहासाने मिळवण्यातकाही अर्थ नसतो.
धक्कादायक सत्य
लाडकी बहिण योजना सुरू झाली. विरोधकांनी या योजनेवर जमेल तशी टीका केली. कोणी मतांसाठी लाडक्या बहिणींना लाच देण्यात येत आहे, असा आरोप केला. योजनेला मिळणारा प्रतिसाद बघून मग विरोधकांनी सुद्धा याच योजनेसारखी महालक्ष्मी योजना राबविण्याची घोषणा केली होती. सहज मिळणारी आर्थिक मदत काय करीश्मा दाखवून शकते, हे या योजनेने दाखवून दिले. आता सरकारने पुढचे पाऊल उचलले आहे. सरकारी पडताळणीत सत्य बाहेर येईलच आणि ते निश्चितच सर्वांना अचंबित करणारे ठरणार आहे.