महाराष्ट्र

Nana Patole : महायुतीला आता लाडक्या बहिणीची गरज नाही 

Mahayuti : नाना पटोलेंची बोचरी टीका; ‘सत्तापक्ष मतदारांच्या मतांची थट्टा करतो’

Ladki Bahin Yojana : राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चिमटा घेतला. यात विशेषत्वाने नाना पटोलेंचा उल्लेख करत विरोधकांना डिवचले. याची दिवसभर चर्चा झाली. पण नाना पटोले यांनी देखील विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. महायुतीला आता लाडक्या बहिणींची गरज नाही. सत्तापक्ष मतदारांच्या मतांची थट्टा करीत आहे, अशी टीका त्यांनी केली.

‘लाडकी बहीण’मुळेच पुन्हा सत्तेत आलो असा दावा भाजप-महायुतीचे नेते करतात. पण आता निवडणुका संपल्याने लाडक्या बहिणीची महायुतीला गरज राहिलेली नाही. लाडकी बहीण योजनेचा विषय आता संपला आहे. सरकारचा शपथविधी होताच दोन दिवसात एका ‘लाडक्या भावाला’ एक हजार कोटी रुपयांची संपत्ती परत मिळाली आहे. ही तर सुरुवात असून ‘आगे आगे देखो होता है क्या?,’ असं नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्रात सत्तेत आलेले सरकार हे ‘लाडक्या भावा’साठी काम करणारे सरकार आहे, असा हल्लाबोल देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.

महायुतीला पाशवी बहुमत मिळाले. त्यामुळे त्यांची मस्ती दिसत आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर अभिनंदनाचा ठराव मांडला असता त्यावरच चर्चा होणे अपेक्षित होते. पण सत्ताधारी पक्षातील सदस्य मतदारांची थट्टा करत होते. मारकवाडीप्रमाणे इतर गावातही ग्रामसभा ठराव करत आहेत. मतदार हा राजा आहे, त्याला मताचा अधिकार असून आपले मत कुठे गेले हे जनता विचारत आहे. मारकडवाडीतील लोक मॉक पोलिंग करणार होते तो अधिकार गावकऱ्यांना आहे. तो कोणीही हिरावू शकत नाही. मारकडवाडीच्या मुद्यावर सभागृहातही चर्चा झाली पाहिजे पण सत्तापक्ष मतदारांच्या मतांची थट्टा करीत आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.

Nana Patole : मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका

विरोधी पक्षनेतेपदासाठी अडचण नाही

महाराष्ट्र विधिमंडळाला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. अनेकदा काँग्रेसकडे मोठे बहुमत असतानाही त्यावेळी विरोधी पक्षांची सदस्य संख्या न पहाता विरोधी पक्षनेते पद दिले होते. हीच परंपरा लक्षात घेतली पाहिजे. विधानसभेचा विरोधीपक्ष नेता व उपाध्यक्ष विरोधी पक्षांचा असावा अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत मांडली आहे. सरकारही सकारात्मक असून नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता निश्चित असेल अशी अपेक्षा आहे, असे नाना पटोले म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!