विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीची हवा असल्याचा विचार करून अनेकांनी पक्ष बदलले होते. यात विशेषतः शिंदेंच्या सेनेतून उद्धव गटात जाणारे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शरद पवारांकडे जाणाऱ्यांची संख्या जास्त होती. मात्र, महायुतीची सत्ता येताच अनेकांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः काकांकडे गेलेले कार्यकर्ते व नेते आता पुन्हा दादांच्या दिशेने वळले आहेत. राष्ट्रवादीचे नेते सतीश शिंदे यांनी देखील शरद पवारांची साथ सोडून पुन्हा एकदा दादांचे घड्याळ हाताला बांधले आहे.
लोकसभा निवडणुकीतील निकालाने अनेक गोष्टी बदलल्या. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘चारशेपार’चा नारा फसला. त्यामुळे देशात एनडीएला बहुमत तर मिळाले, पण अपेक्षेपेक्षा कमी जागा आल्यामुळे मोदीविरोधी लाट असल्याचे सर्वांना वाटले. त्यातही महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिले. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या महायुतीला सपशेल अपयश आले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काँग्रेस, उद्धव ठाकरे गट व शरद पवार गटाने मात्र दमदार कामगिरी करत महाराष्ट्र आपल्यासोबत असल्याचे सांगितले. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजुने वातावरण असल्याचे वाटू लागले.
शरद पवारांनी दिले होते निर्देश
विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. तर काही लोक अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शरद पवारांच्या गटात सामील झाले. यात शरद पवारांचे जुने कार्यकर्ते सतीश शिंदे यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादी फुटली तेव्हा त्यांनी अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी त्यांना काटोलमध्ये सलील देशमुख यांच्यासाठी काम करण्याचे निर्देश दिले. सतीश शिंदे शरद पवारांच्या शब्दाबाहेर नव्हते. त्यांनी दादांची साथ सोडून शरद पवारांचा हात धरला. काटोलमध्ये देशमुखांसाठी काम केले. पण सलील देशमुख पराभूत झाले. आता सतीश शिंदे यांनी पुन्हा एकदा अजितदादांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पूर्व नागपूरची जागा महायुतीमध्ये भाजपकडेच जाणार हे निश्चित होते. पण तरीही आभा पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रह धरला. त्या अजित पवार गटाच्या नेत्या आहेत. त्यांनी पूर्व नागपूरमधून तयारी देखील केली. पण अपेक्षेप्रमाणे कृष्णा खोपडे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे आभा पांडे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) आभा पांडे यांच्यासह बंडखोरांना नोटीस बजावल्या. पण आता आभा पांडे यांनी अजित पवारांची भेट घेऊन अभिनंदन केले. त्यामुळे त्यांच्यासह अनेकांना बजावलेल्या नोटीस मागे घेतल्याचे बोलले जात आहे.