केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे संदर्भाचा खजिना आहे. प्रसंगानुरुप ते आपल्या पेटाऱ्यातून एक एक संदर्भ बाहेर काढत असतात. शनिवारी (दि. 7) अग्नीशमन महाविद्यालयाच्या कार्यक्रमात बोलतानाही त्यांनी एका हॉलीवूड चित्रपटाची आठवण सांगितली. याठिकाणी उपस्थित ‘अग्नी’ चित्रपटाच्या कलावंतांनाही खास शुभेच्छा दिल्या. सामाजिक विषयावरील चित्रपट करणे हे एडव्हेंचरप्रमाणे आहे, या शब्दांत त्यांनी ‘अग्नी’च्या टीमचेही कौतुक केले.
केंद्रीय गृह मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय- एनएफएससी येथे ‘इलेक्ट्रिक वाहनातील आगीच्या दुर्घटनांचे व्यवस्थापन’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘अग्नी’ चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया आणि सुप्रसिद्ध अभिनेता प्रतिक गांधी देखील उपस्थित होते. ‘अग्नी’ चित्रपटाच्या निमित्ताने गडकरींनी सत्तरच्या दशकातील एका हॉलीवूड चित्रपटाची आठवण सांगितली.
ते म्हणाले, ‘सत्तरच्या दशकात ‘टॉवरिंग इनफर्नो’ नावाचा एक अमेरिकन चित्रपट आला होता. हा चित्रपट खूप गाजला. फायर ब्रिगेड सर्व्हिसला समर्पित हा सिनेमा मी देखील बघितला. त्यावेळी मी शाळेत शिकायचो. हा एक ऐतिहासिक चित्रपट होता.’ आज ‘अग्नी’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रतिक गांधी आणि ढोलकिया यांना देखील मी ‘ग्रेट एडव्हेंचर’साठी शुभेच्छा देतो. या चित्रपटात सेक्स आणि हिंसा नाही, त्यामुळे माझ्या दृष्टीने हे एक एडव्हेंचरच आहे. सामाजिक विषयावर चित्रपट असल्यामुळेच ‘एडव्हेंचर’ असा उल्लेख करतोय, असेही गडकरी म्हणाले.
Nitin Gadkari : गडकरींना आठवला सत्तरच्या दशकातील हॉलीवूड सिनेमा
यावेळी गडकरींनी इलेक्ट्रिक वाहने आणि त्यातील बॅटरीच्या संदर्भातही माहिती दिली. भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग 2030 पर्यंत 4 कोटी रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र राहणार आहे. जम्मू येथे लिथियमचे साठे मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. त्यामुळे हे लिथियम आयन बॅटरीच्या स्वरूपात 60 कोटी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरण्यात येतील. एवढेच नव्हे तर त्याचप्रमाणे लिथियम आयन बॅटरीची किंमत सुद्धा कमी होईल, असंही ते म्हणाले.
हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजी, इलेक्ट्रिक हे भविष्यातील इंधन आहे. या इंधनाच्या वापराने किफायतशीर प्रदूषण मुक्त असे इंधन उपलब्ध होईल. त्यामुळे सुरक्षित परिवहन सुनिश्चित होणार आहे. शेतातील तण, परली, ऊसाची मळी यापासून बायो सीएनजीच्या निर्मितीचे 400 प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्यापैकी 60 प्रकल्प सध्या सुरू झाले आहेत. भंडारा जिल्ह्यात सुद्धा राईस हस्क पासून बायो सीएनजीचा प्रकल्प सुरू झाला आहे, असंही गडकरी म्हणाले.