महाराष्ट्र

Mahavikas Aghadi : समाजवादी पार्टी एक्झिट करणार

Samajwadi Party : अबू आजमी यांची घोषणा

Announcement By Abu Azmi : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे भगदाड पडणार आहे. समाजवादी पार्टीने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अबू आजमी यांनी ही घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधान मंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी आजमी यांनी ही घोषणा केली. समाजवादी पार्टी महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्ष आहे. मात्र त्यांनी आता आघाडीपासून फारकत घेतल्याने आगामी काळात आघाडीला संघर्ष करावा लागणार की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये कोणताही समन्वय नव्हता. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांनी मनाला वाटेल त्या पद्धतीने काम केले. महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता गरजेची आहे. परंतु याचा अभाव विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकर्षाने जाणवला. कोणत्याही पक्षाचा नेता निवडणूक लढत असेल तर त्याला आपला नेता- उमेदवार समजलं गेलं पाहिजे. पण कोणत्याही प्रकारचा समन्वय नव्हता, असं अबु आजमी म्हणाले.

एकट्याने प्रचार 

महाविकास आघाडीचे नेते एकमेकांच्या उमेदवारांच्या मंचावर प्रचारासाठी दिसले नाहीत. खूप कमी वेळा हे चित्र पाहायला मिळालं. जागा वाटपावेळी रस्सीखेच पाहायला मिळाली. याचमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला, असं अबु आजमी यांनी सांगितलं. आता महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. महाविकास आघाडी मधील कोणतेही नेत्याने विशेष अधिवेशनात आमदारकीची शपथ घेतली नाही. मात्र समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांनी विधिमंडळात शपथ घेत प्रक्रिया पूर्ण केली.

Mahavikas Aghadi : ‘आय लव्ह मारकडवाडी’ म्हणत महाविकासच्या नेत्यांची फलकबाजी !

समाजवादी पार्टी महाविकास आघाडीमधून बाहेर पडल्याने आघाडीतील मित्र पक्षांची संख्या कमी झाली आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडी मधील अनेक नेते संपर्कात असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांनी तर खासदार संजय राऊत यांना सल्ला दिला आहे. संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेमध्ये लोकांना त्रास आहे. त्यामुळे आता तरी संजय राऊत यांनी आपलं वर्तन सुधारावं असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.

भवितव्य काय? 

महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची संख्या विधिमंडळात कमी आहे. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळणार? याबद्दल अनिश्चितता आहे. या सगळ्या घडामोडीत महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेतलेली नाही. त्यामुळे आघाडी मधील एकही उमेदवार सध्या विधानसभेचा सदस्य झालेला नाही. परिणामी महाविकास आघाडीला नव्या कायदेशीर अडचणीला सामोरे जावे लागू शकते. आमदारांनी शपथ न घेतल्यास त्यांना संवैधानिक अधिकार मिळणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!