महाराष्ट्र

Devendra Fadnavis 3.0 : देशभरातील मान्यवरांची शपथविधीला हजेरी 

Mahayuti 2.0 : पाहुण्यांच्या गर्दीने भरले आझाद मैदान 

Oath Ceremony : मुंबईच्या आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्याला देशभरातील दिग्गजांनी हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देश-विदेशातील मान्यवर आझाद मैदानावर उपस्थित होते.

उद्योग आणि चित्रपट जगतातील अनेक मान्यवर देखील शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार ठरले. बिर्ला समूहाचे कुमार मंगलम बिर्ला, मुकेश अंबानी, अनिल अंबानी, अभिनेता रणवीर सिंह, गौतम अदानी यांची मैदानावर उपस्थिती होती. अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेते सुबोध भावे, सचिन तेंडुलकर यांची उपस्थिती देखील लक्षवेधी ठरली. संगीतकार अजय आणि अतुल यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

एकमेकांच्या भेटीगाठी 

बॉलीवूडमधील अनेक अभिनेते शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. यामध्ये संजय दत्त, शाहरुख खान, सलमान खान, माधुरी दीक्षित यांनी देखील एकमेकांची भेट घेतली. देशातील भाजपशासित राज्यांचे जवळपास सर्वच मुख्यमंत्री आझाद मैदानावरील सोहळ्याला उपस्थित होते. योगेश पुढारी, रोहित शेट्टी, अर्जुन कपूर, सतीश मेहता, एटली, बोनी कपूर, श्रद्धा कपूर, बादशाह, जयेश शाह, जॉन इब्राहिम हे देखील सोहळ्यामध्ये उपस्थित होते.

विकी कौशल, खुशी कपूर, रुपाली गांगुली, सुधाकर शेट्टी, धवल मेहता, आलोक संघवी, ज्योति पारेख, आलोक कुमार, अरविंकुमार, बोनी कपूर यांच्या उपस्थितीने देखील सर्वांचे लक्ष वेधले. व्यासपीठावर गोंदियाचे राज्यसभा खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची भेट घेतली.

देशभरातील वेगवेगळ्या धर्माचे साधुसंत देखील शपथविधी सोहळ्याचे भागीदार झाले होते. याशिवाय महायुतीमधील भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आझाद मैदानावर उपस्थित होते. शपथविधी सोहळा सायंकाळी होता. मात्र दुपारपासूनच आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मुंबईमध्ये झालेल्या या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आला होता. मुंबई पोलीस दलातील सुमारे 30 हजार पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले.

मुंबई आणि आसपासच्या परिसरातूनही मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त मागविण्यात आला होता. देशभरातील सर्वच महत्त्वाचे आणि अतिमहत्त्वाचे व्यक्ती आझाद मैदानावर एकत्र आले. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्येही बदल करण्यात आला होता. शपथविधी सोहळ्याचे स्थळ असलेल्या आझाद मैदान परिसरातील संपूर्ण परिसर ‘नो फ्लाईंग झोन’ जाहीर करण्यात आला होता. या संपूर्ण परिसरामध्ये ड्रोनच्या माध्यमातूनही नजर ठेवण्यात येत होती.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!