या लेखातील मतं लेखकाची आहेत. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असं नाही.
Suggestion By Minister : प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा विचार करत असतो. अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा तो प्रयत्न करतो. उत्सुकता वाटणा-या प्रश्नांची उत्तरे मिळावीत यासाठी विविध मार्गाचा आधार शोधतो. कुणी ज्ञानी पुरुषांची व्याख्याने ऐकतो. कुणी प्रवचन, कीर्तन, सत्संग मंडळाच्या कार्यक्रमांना हजेरी लावतो. काही वाचनप्रेमी पुस्तकांतून उत्तरे शोधतात. काही आपल्या गुरुंचे मार्गदर्शन घेतात. आता तर प्रत्येक विषयाचे मार्गदर्शन करणारे अभ्यासक्रम घरबसल्या उपलब्ध झाले आहेत. विविध समाज माध्यमातून हवी ती माहिती मिळवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. काही सभोवतीच्या अवलोकनातून, अनुभवातून आपल्या ज्ञानात भर घालतात. काही अंतर्मुख होऊन विचार करणारे असतात.
एकंदरीत माणूस प्रत्येक बाबतीचे ठोकताळे व उत्तरे आपल्या कुवतीनुसार ठरवीत असतो. काही सन्माननीय व्यक्ती अगदी सहजपणे आपल्या मनात घोंगावणाऱ्या प्रश्नांची सोप्या भाषेत उकल करतात. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी राजकारण या विषयाची आपल्या विनोदप्रचुर शैलीत उकल केली. सोबतच सर्वांना गहन वाटणाऱ्या जीवन या विषयाची सुरेख व्याख्या सांगितली. राजकारण या विषयावर आपण सारेच खूप भरभरून बोलतो.
आपली मतं मांडायला राजकारणा सारखा सुरस विषय नाही.तसे पाहिले तर राजकारण हा सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा विषय आहे. हा गहन आणि क्लिष्ट विषय समजणे सोपे नाही. राजकारण हा लय भारी असलेला विषय आहे. या क्षेत्रात असलेल्या व्यक्ती राजकारण आप आपल्या परीने खेळत असतात. अलिकडे राजकारण हा सर्वाधिक लोकप्रिय असा प्रांत झाला आहे. या क्षेत्रात येणा-यांचा ओढा वाढत आहे. त्या मागची कारणे वेगवेगळी आहेत.
असा हा समुद्र
राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा सागर आहे. येथे प्रत्येक जण दुःखी आहे. प्रत्येक व्यक्तीला ते सध्या ज्या पदावर आहेत त्याहून अधिक मोठ्या पदाची लालसा आहे. असे सुस्पष्ट विचार नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नागपूर येथे एका पुस्तकाच्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी राजकारणात या विषयाची सद्य:परिस्थिती हेरुन उकल केली. नितीन गडकरी यांचे वक्तव्य राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीचे मार्मिक अवलोकन करणारे आहे.
राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा सागर आहे. या आपल्या वक्तव्याचे सुंदर विवेचन ही त्यांनी केले. एखादा नगरसेवक आपण आमदार का नाही म्हणून दुःखी आहे. आमदाराला आपण मंत्री का झालो नाही असे वाटते. मंत्रिपदावर वर्णी लागली तर चांगले खाते मिळाले नाही म्हणून तो व्यथित होतो. राजकारणात राहुन मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचता आले नाही म्हणून अनेक जण खंत व्यक्त करताना दिसतात.मुख्यमंत्र्याला पक्षश्रेष्ठी आपली केव्हा बोळवण करतील? याची भीती असते. तो सतत तणावाखाली असतो, असे वास्तव त्यांनी मांडले.
पुस्तकाचे प्रकाशन
नितीन गडकरी यांच्या हस्ते 50 रुल्स ऑफ लाइफ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांनी जीवनाची सोप्या भाषेत व्याख्या सांगितली. जीवन हे तडजोड, सक्ती, मर्यादा आणि विरोधाभास यांचा खेळ आहे. ते आव्हाने आणि समस्यांनी भरलेले आहे. क्षेत्र कोणतेही असो प्रत्येकाला त्याचा सामना हा करावाच लागतो. प्रत्येकाला जीवन कसे जगावे हे समजले पाहिजे. त्यासाठी ‘ प्रत्येकाने आर्ट ऑफ लिव्हिंग ही शैली समजून घेणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
जीवनातील समस्या मोठी आव्हाने निर्माण करतात. त्याचा मुकाबला करुन यशस्वी मार्गक्रमण करणे म्हणजेच आर्ट ऑफ लिव्हिंग होय, असे त्यांनी समजावून सांगितले. यावेळी त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे वाक्य उद्धृत केले. एखाद्याचा पराभव झाला तर तो संपत नाही. तो जेव्हा सर्व त्याग करतो तेव्हा तो संपतो. नितीन गडकरी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. आपल्या कार्य कतृत्वाने ते ओळखले जातात. केंद्रीय राजकारणात त्यांचा दबदबा आहे. अजातशत्रू नेता म्हणून ते ओळखले जातात. त्यांचा अनुभव आणि व्यासंग दांडगा आहे. स्पष्ट बोलणे हा त्यांच्यातील विशेष गुण आहे.
बेधडक भाषण
आपल्या भाषणांतून ते अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपली मते अगदी सोप्या भाषेत मांडतात. नितीनजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेलं संस्कारक्षम असे प्रगल्भ असे व्यक्तीमत्व आहे. संधी मिळेल, तेव्हा ते आपले अनुभव, मौलीक विचार वेगवेगळ्या कार्यक्रमांतून व्यक्त करीत असतात. चांगले विचार मौलीक असतात. जीवनाची वाट सुकर करण्यात ते नक्कीच सहाय्यभूत ठरतात.
Mahayuti 2.0 : शाही शपथविधी; पंतप्रधानांसह 22 मुख्यमंत्री येणार
जीवन म्हणजे काय? असा प्रश्न बहुतेकांना पडतो. प्रत्येकाची जीवनविषयक संकल्पना वेगवेगळी असते. काही जण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आनंदाने जगतात. वर्तमान त्यांना महत्वाचे वाटते. काही सतत नैराश्याचा सूर आळवतात. नकारार्थी विचारांचा पगडा त्यांचेवर असतो. अशा व्यक्ती सतत दुःखी आणि चिंताग्रस्त राहतात.जीवनातील आनंदाला ते पारखे होतात. त्यामुळे प्रत्येकाने जीवन आनंदी आणि समाधानाने जगण्याची कला आत्मसात करायला हवी.