Vanchit Bahujan Aghadi : अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. अनुप धोत्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. कोर्टाच्या या नोटीसीमुळे थेट त्यांच्या खासदारकीलाच मोठे आव्हान देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गोपाल चव्हाण यांनी अनुप धोत्रे यांच्या लोकसभेवरील निवडीला आव्हान दिले आहे. तसेच या नोटीसला 2 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व्यवहार केला असल्याचा आरोप करत त्यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात खर्चाची मर्यादा 95 लाख इतकी होती. मात्र अनुप धोत्रे यांनी 1 कोटी 24 लाख 60 हजार 590 रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या असल्याचा आरोप वंचितचे कार्यकर्ते गोपाल चव्हाण यांनी केला आहे. धोत्रे यांनी हा खर्च लपवून ठेवला असल्याचा देखील आरोप चव्हाण यांनी केला आहे.
कारवाईची मागणी
अनुप धोत्रे यांच्या निवडणुकीचा खर्च एकूण 87 लाख 72 हजार 932 एवढा दाखवण्यात आला होता. पक्षाने धोत्रे यांच्या निवडणूक प्रचारासाठी 1 कोटी 24 लाख 60 हजार 590 रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याचे याचिकेत म्हटले आहे. अनुप धोत्रे यांनी या खर्चाची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक होते. मात्र त्यांनी हा खर्च लपवून ठेवला. निवडणूक आयोगाची दिशाभूल केली आहे. यामुळे त्यांची लोकसभेतील खासदारकीची निवड रद्द करण्यात यावी, असे याचिकाकर्ते वंचितचे गोपाळ चव्हाण यांनी नमूद केले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये अनुप धोत्रे यांनी कॉंग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला. त्यानंतर आता त्यांच्या विजयाला कोर्टात आव्हान दिले आहे. अकोल्याचे माजी खासदार संजय धोत्रे यांची प्रकृती ठीक नसल्याने भाजपने त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना निवडणुकीत उतरवले होते. या निवडणुकीत अनुप धोत्रे यांचा विजय झाला.
Anup Dhotre : खासदार मंत्र्यांना म्हणाले अकोल्याला टेक्सटाइल हब करायचेय
वंचित बहुजन आघाडीमुळे अनुप धोत्रे यांचा विजय झाल्याची टीका त्यावेळी काँग्रेसने केली होती. वंचित बहुजन आघाडी भारतीय जनता पार्टीला मदतीच्या दृष्टीने निवडणुकीत काम करत असल्याचा आरोप सातत्याने होतो. लोकसभा निवडणुकीत धोत्रे यांचा विजय झाल्यानंतर हा आरोप पुन्हा झाला. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीकडूनच अनुप धोत्रे यांच्या विजयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याचिकाकर्त्याने केलेला आरोप त्यांना सिद्ध करावा लागणार आहे. असे झाल्यास अनुप धोत्रे यांची खासदारकी धोक्याची येऊ शकते.