Election In Maharashtra : विधानसभा निवडणूक नुकतीच आटोपली आहे. सत्ता स्थापन व मुख्यमंत्री पदाबाबत अद्यापही निर्णय झाला नाही. अशात राज्यभरात ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या जनआंदोलनाची सुरुवात स्वाक्षरी मोहिमेपासून होणार आहे. हे आंदोलन टप्याटप्प्याने तीव्र करण्यात येणार आहे. पुणे येथे रविवारी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा ठराव पारित करण्यात आला आहे.
राज्यात 3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत मतदान यंत्रविरोधी स्वाक्षरी मोहीम वंचितकडून राबविण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडीओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएमविरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
आघाडीसोबत लढा
2004 पासून प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात ईव्हीएमविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढा सुद्धा वंचित देत आहेत यंत्राच्या वापरामधील अनेक घोळ त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माध्यमांसमोर मांडले आहेत. वंचित बहुजन आघाडीने ईव्हीएमच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेत राज्यातील सर्व मतदारांनी सामील होऊन ईव्हीएमला हद्दपार करण्यासाठी लढा द्यावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमध्ये घोटाळा करण्यात आला, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यापुढे सर्व निवडणूक ईव्हीएमद्वारे न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. ईव्हीएमच्या विरोधात महाविकास आघाडी आधीपासूनच आंदोलन करीत आहे. काँग्रेसकडून ‘ईव्हीएम छोडो’ यात्रा काँग्रेसकडून काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. शिवसेना ठाकरे गटानंही या आंदोलनात उडी घेतली आहे. ईव्हीएम विरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचं विरोधी पक्षातील नेत्यांनी ठरवलं आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीचीही भर पडली आहे.
कायदेशीर लढाई लढण्यासाठीदेखील महाविकास आघाडीने तयारी सुरु केली आहे. ईव्हीएम विरोधात आता मागे हटायचं नाही. कायदेशीर लढाई लढायची आहे. कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम करण्याचाही निर्णय शरद पवार यांनी निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकार येणार असं दिसत होतं. लोकांचा देखील प्रतिसाद देखील होता. कित्येक ठिकाणी धनशक्तीचा वापर झाला.