महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मै समंदर हू लोट के फिर आऊंगा..!

Nagpur : नागपुरात झळकले 'मी पुन्हा येईल'चे बॅनर्स

‘मी पुन्हा येईन’, हे वाक्य ऐकलं की, भाजप नेते देवैंद्र फडणवीस यांचीच आठवण येते. सन 2014 ते 2019 या कालावधीत फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. 2019मध्ये शेवटी झालेल्या अधिवेशनात ‘मी पुन्हा येईन..’, ही कविता त्यांनी म्हटली होती. म्हणजे 2019 ते 2024 या कालावधीतही मीच मुख्यमंत्री असणार, असा त्याचा अर्थ लावण्यात आला होता.

2019 च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली. दिग्गज, मुत्सद्दी नेते शरद पवार यांनी असे काही चक्र फिरवले की, भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. महाविकास आघाडीचा प्रयोग करत पवारांनी काँग्रेससह शिवसेनेला सोबत घेतले आणि सत्ता स्थापन केली. यावेळी ‘मी पुन्हा येईन’, ही फडणवीसांची घोषणा फोल ठरली. यासाठी शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले. पण हार मानतील ते फडणवीस कसले? ‘चोर पे मोर..’चा प्रत्यय फडणवीसांनी महाराष्ट्राला दिला.

शिंदेंच्या मदतीने पुन्हा सत्ता स्थापन

महाविकास आघाडी सरकारचा बराचसा कालावधी कोरोनामध्ये गेला. कोरोनाच्या महामारीतून देश आणि राज्य हळूहळू सावरायला लागले. इकडे फडणवीसांचे कामही सुरूच होते. महाविकास सरकारला जवळपास अडीच वर्ष झाले होते. दरम्यान शिवसेनेचे नेते, ठाकरेंचे विश्वासू एकनाथ शिंदे 10-12 आमदार घेऊन सुरतकडे निघाले. आधी सुरत नंतर आसामधील गुवाहाटी असा प्रवास त्यांनी केला. पाहता पाहता आमदारांची संख्या 40 वर पोहोचली. देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या मदतीने पुन्हा सत्ता स्थापन केली. या सत्तास्थापनेचे शिल्पकार देवेंद्र फडणवीसच आहेत आणि तेच मुख्यमंत्री होतील, असे चित्र तेव्हा तयार झाले होते. पण काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि ऐन वेळेवर एकनाथ शिंदे यांच्या नावाची मु्ख्यमंत्री म्हणून घोषणा झाली.

दुसऱ्यांदाही फडणवीसांचे ‘मी पुन्हा येईन’, साध्य झाले नाही. जिद्दी फडणवीसांनी आताही हार मानली नव्हती. काही काळानंतर फडणवीसांनी अजित पवार यांना सोबत घेतले आणि उपमुख्यमंत्री बनवले. महत्वाचे असे अर्थ खातेही त्यांना दिले. आता सरकार अतिशय मजबूत स्थितीत आले होते. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यां तिघांनी महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांचीही मान्यता होती. या ‘त्रिमुर्ती’ने 2024च्या निवडणुकीत इतिहास रचला. एकटया भाजपने 132 जागा मिळवल्या. तर महायुतीच्या एकुण जागा 235 च्या वर निवडून आल्या.

Assembly Election : ईव्हीएम हॅक करण्याचा व्हिडिओ व्हायरल!

मुख्यमंत्री अद्यापही ठरला नाही

घवघवीत यश मिळवल्यानंतर महायुतीच्या महाविजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस, असे चित्र तयार झाले. आता देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, हे जवळपास निश्चित मानले जात होते. पण आज 9 दिवस उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री कोण, हे ठरलेले नाही. चर्चांचे गुऱ्हाळ सुरू आहे. पण महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळालेला नाही. मध्यंतरीच्या काळात मुरलीधर मोहोळ आणि काही नावे समोर आली. पण नंतर या नावांवरही शिक्कामोर्तब होऊ शकले नाही.

आज सकाळी ‘मी पुन्हा येईन’,चे बॅनर्स नागपूर शहरात झळकले. यामध्ये एक नेता गर्दीकडे बघून गर्जना करता दिसतो आहे. हा फोटो पाठमोरा आहे. चेहरा दिसत नाही. पण ही घोषणा देवेंद्र फडणवीसांचीच आहे, हे फक्त नागपूरकच नाही अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे फडणवीसच मुख्यमंत्री बनतील, अशी खात्रीशीर माहिती फडणवीसांच्या समर्थकांना मिळाली असावी. त्यामुळे हे बॅनर्स आज झळकले असावे, अशी चर्चा नागपुरात सुरू झाली आहे.

‘मी पुन्हा येईन’, यासोबतच. ‘मेरा पानी कम देख किनारे पे घर मत बसा लेना, मै समंदर हुं, लौट के फिर जरूर आऊंगा..’ फडणवीसांनी म्हटलेली ही शायरीही महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यामुळे आता मीच मुख्यमंत्री होणार, असे तर देवेंद्र फडणवीस यांना सुचनायचे नाही ना..!

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!