संपादकीय

Mahayuti 2.0 : सारे कसे दणक्यात अन् गाजत वाजत

New Government : शपथविधी सोहळा ठरणार संस्मरणीय

या लेखातील मतं लेखकाची आहेत. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असे नाही.

Power Play : आता कौटुंबिक असो की सार्वजनिक समारंभ साधेपणाने होत नाहीत. गर्दीची वर्दळ असल्याशिवाय कोणाला करमत नाही.सगळे कसे थाटात, जल्लोषात आणि दणक्यात साजरे व्हावे, असे सर्वांना वाटते. प्रत्येक गोष्टीचा गाजावाजा झालाच पाहिजे या दृष्टीने प्रयत्नही केले जातात. ‘माहोल बनने को मंगता’, असा काहीसा हा प्रकार असतो. कार्यक्रम आणि समारंभाची जाहीरात करण्यासाठी आता विविध माध्यमे उपलब्ध आहेत.

सोशल मीडियाची धमाल तसेच कमाल सर्वश्रुत आहे. आता नवीन मंत्री मंडळाचा शपथविधी राजभवनातील सभागृहात न होता आझाद मैदानावर होत आहे. पाच डिसेंबर हा या जंगी आणि जाहीर कार्यक्रमाचा मुहूर्त ठरला आहे.हा शपथविधी सोहळा संस्मरणीय व्हावा यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. आतापर्यंतचे सारे नियम, प्रथा याला सोईस्करपणे अलगद बाजूला ठेवण्यात आले आहे. अजून महायुतीच्या आमदारांची संयुक्त बैठक झालेली नाही. भाजप पक्षाच्या गटनेत्याची निवड झाली नाही.

निमंत्रणाची वाट

राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे निमंत्रण कुणाला दिले नाही. तरीही सत्ता स्थापनेचा मुहूर्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला. कार्यक्रमाची वेळ तसेच उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची नावे सांगितली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. शपथविधी नंतर प्रत्येक जिल्ह्यात जल्लोष केला जाणार आहे.

बावनकुळे यांच्या घोषणेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यपालांना आपल्या घटनात्मक अधिकाराचा वापर करण्याची अजूनपर्यंत तरी संधी मिळाल्याचे दिसत नाही. विधानसभा निवडणुकीत महायुतीला नेत्रदीपक यश मिळाले. सत्ताधारी महायुतीच्या वर्तुळात आनंद आणि जल्लोषाचे वातावरण आहे.आता राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण राहणार, मंत्री मंडळात कोणाला संधी मिळणार यावर चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांचे नाव अजून गुलदस्त्यातच आहे. भाजपने सर्वात जास्त जिंकल्या. सहाजिकच हे पद याच पक्षाला मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे.‌ आता अन्य एक दोन नावांचा या पदासाठी उल्लेख केला जात आहे. संभ्रम वाढला आहे. निवडणूक निकालानंतर वेगवेगळ्या कारणांनी रुसवे फुगवे, हट्ट, आग्रह या सारखे नाट्यमय एपिसोड सुरू आहेत.

सारे कसे निवांत

निवडणूक निकाल लागून नऊ दिवसांचा कालावधी लोटला आहे. अजून कुठल्याही हालचालींनी वेग घेतलेला नाही. काय घाई आहे? अशा आविर्भावात सारे कसे शांत आणि निवांत सुरू आहे. ठोस निर्णय झालेला नाही. सर्व काही आलबेल असून मंत्री मंडळ स्थापनेला विलंब का होतोय, नेमके घोडे अडले तरी कुठे असे प्रश्न सहाजिकच विचारले जात आहेत.या बाबत शिल्लक असलेल्या विरोधकांकडून टीका होतांना दिसते.

निवडणूक निकाल लागले. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी अनेकांनी लावून धरली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात आली. महायुतीच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहेत. या मागणीमुळे काही प्रश्न उपस्थित केले. नेत्यांच्या चेह-यावरील भावमुद्रा टिपून राजी नाराजीचे अंदाज टिपण्याचा प्रयत्न झाला.

अखेर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्रातील श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपणास मान्य राहील असे स्पष्ट केले.

ताप की मनःस्ताप

दिल्ली येथे गृहमंत्री अमित शाह यांची महायुतीच्या तिनही नेत्यांनी भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत नेमका कोणता ठोस निर्णय झाला हे मात्र कुणाला कळलेच नाही. नेते मुंबईत परतले. नंतर पुन्हा नवा विषय चर्चेत आला. एकनाथ शिंदे गृहमंत्री पदाबाबत आग्रही आहेत, असे सांगण्यात येऊ लागले.

आल्या आल्याच ते तडकाफडकी त्यांच्या सातारा जिल्ह्यातील गावी निघून गेले. आजारपणाचे तसेच तापाचे कारण त्यांच्या समर्थकांनी दिले.‌ त्यांना ताप आला होता की मनःस्ताप यावर चर्चा सुरू आहे.

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच व्हावेत यासाठी राज्य भाजपा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आग्रही आहे. फडणवीस यांची क्षमता केंद्रीय नेतृत्वाने लक्षात घ्यायला हवी 2014 ते 2019 या काळात त्यांनी मुख्यमंत्री पद भूषविले उल्लेखनीय कामगिरी केली, असे संघाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्व या पदासाठी मुरलीधर मोहोळ या पर्यायी नावाचा विचार करीत असल्याचे सांगण्यात येते.प्रत्यक्षात या तर्काला कोणताही आधार नाही, असे संघाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री पदासंदर्भातील या वेगवेगळ्या भूमिकांमुळे अद्याप मुख्यमंत्री पदाचे नांव निश्चित झाले नाही, अशी चर्चा आहे.

Amravati Politics : रवी भैया की नवनीत भाभी? ‘सागर’वर प्रदीर्घ चर्चा

ताकदीचे दर्शन

या आधी निवडणूक निकालानंतर तीन चार दिवसांत नवे सरकार सत्तारूढ होत होते. शपथविधी सोहळा राजभवनात साध्या आणि दिमाखदार पद्धतीने व्हायचा. फारसा गाजावाजा नसायचा. यंदाच्या निवडणुकीत सारेच बदलले आहे. निवडणूक युध्दासारखी लढण्यात आली. कधी नव्हे इतके घवघवीत यश महायुतीला मिळाले. त्यामुळे सर्वांचाच उत्साह दांडगा आहे. एक अटीतटीचे युद्ध जिंकल्याचा आविर्भाव त्यात आहे. विरोधक संपल्यातच जमा आहेत. शपथविधी सोहळ्याचे निमित्त साधून महायुतीच्या आपल्या सांघीक ताकदीचे दर्शन अनायसेच सर्वांना घडणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!