Protest By Party : जिल्हा परिषद अध्यक्ष असताना तुमच्याच गावातून मतं कशी कमी पडली, असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला केवळ 99 मतं मिळालीच कशी असा जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडीतून निलंबित करण्यात आलं आहे.
तीन वर्षांसाठी निलंबित केले
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मिळालेल्या मतांची गोळा बेरीज केली. कार्यकर्त्यांना आपल्याच उमेदवाराला 99 मतं मिळाल्याचं लक्षात आलं. ज्या गावातून उमेदवाराला सर्वात कमी मतदान झालं, ते गाव जिल्हा परिषद अध्यक्ष यांचं असल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते त्यांना जाब विचारण्यासाठी गेले.
दोघांमध्ये बाचाबाची
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि अध्यक्षांमध्ये चांगलाच वाद झाला. अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप केले. कार्यकर्त्यांनी अयोग्य वर्तन केल्याचं अध्यक्षांचा आरोप होता. तर आपल्याला अयोग्य वागणूक देण्यात आल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणं होतं. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पक्षामध्ये खळबळ उडाली.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर अध्यक्षांना जाब विचारणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडीने तीन वर्षांसाठी निलंबित केले आहे. वंचित बहुजन आघाडीने या कार्यकर्त्यांचा निषेधही व्यक्त केला आहे. अशा पद्धतीने जाब विचारण्याचा अधिकार वंचित बहुजन आघाडीने कोणालाही दिलेला नाही. दिलेला देखील नव्हता. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष यांची कार्यकर्त्यांचे वर्तन चुकीचे होते, असं स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आलं आहे.
अकोला पश्चिम
राज्यात विविध ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. अकोल्यामध्ये जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये वंचितने उमेदवार दिले होते. त्यापैकी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराने वंचित बहुजन आघाडीसोबत ऐनवेळी दगा केला. उर्वरित उमेदवारांपैकी कोणालाही यश मिळवता आलं नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चिंतेत आहेत. यातूनच काही कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना जाब विचारण्याची घटना घडली आहे.