Demand For Recovery : विधानसभेच्या निवडणुकीत यश मिळवल्यानंतर भाजप नेते आशिष देशमुख यांनी पुन्हा एकदा विधानसभेतील बाकांवर जागा मिळवली आहे. लवकरच महायुतीच सरकार स्थापन होईल. त्यामुळे भाजपचे ‘मिशन इलेक्शन’ संपणार आहे. नागपूर जिल्ह्यात हे मिशन संपलेले असले तरी आशिष देशमुख यांचे ‘मिशन बँकेची वसुली’ जोरात सुरू होणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणाचा दुसरा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयाने काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेमुळे केदार यांची आमदारकी धोक्यात आली. लोकसभा निवडणुकीत केदार हे ‘किंगमेकर’ बनले. श्याम बर्वे यांना विजयी करीत त्यांनी लोकसभेत पाठवले. मात्र विधानसभा निवडणुकीत केदार यांना आपली ताकद दाखवता आली नाही. स्वतःच्या जागेवर पत्नी अनुजा केदार यांना त्यांनी उमेदवारी मिळवून दिली. परंतु अनुजा केदार यांचा निवडणुकीत पराभव झाला.
मोहीम तीव्र होणार
आपल्याला झालेली शिक्षा रद्द व्हावी यासाठी सुनील केदार सध्या न्यायालयीन लढा लढत आहेत. दुसरीकडे कोर्टाने दोषी ठरवल्याने भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केदार यांना कोंडीत पकडले आहे. सुनील केदार यांच्याकडून नियमानुसार संपूर्ण रक्कम वसूल केली जावी, यासाठी ते पाठपुरावा करीत आहेत. महायुती सरकारमधील सहकार मंत्र्यांकडेही त्यांनी यासंदर्भात सततची मागणी लावून धरली. त्यामुळे लांबणीवर पडलेली सुनावणी प्रक्रिया रुळावर आली. आता संपूर्ण रक्कम वसुलीसाठी देशमुख हे नवीन सरकार सत्तारूढ झाल्यानंतर लढा देण्याचे संकेत आहेत.
वसुली संदर्भातील प्रक्रिया होत आहे. आमचे या मुद्द्याकडे पूर्ण लक्ष आहे. बँकेमध्ये जो घोटाळा झाला, ती रक्कम शेतकऱ्यांची आहे. ही संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी भूमिका आहे. जे कोणी या घोटाळ्यामध्ये दोषी असतील, त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करणे गरजेचे आहे. ही कारवाई करताना समोर कोण आहे, कोणाचे नाव आहे हे बघण्याची गरज नाही. त्यामुळे नवीन सरकार आल्यानंतर यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे आशिष देशमुख यांनी सांगितले.
Amravati Politics : रवी भैया की नवनीत भाभी? ‘सागर’वर प्रदीर्घ चर्चा
देशमुख यांच्या या भूमिकेमुळे नवीन वर्षामध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्यातील रकमेच्या वसुलीचा मुद्दा चर्चेत राहणार आहे. भाजप आणि आशिष देशमुख वसुलीचे मुद्द्यावर आक्रमक दिसतील. तर दुसरीकडे न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून सुनील केदार हे स्वतःचा बचाव करताना दिसणार आहेत.