Assembly Election : बुलढाणा जिल्ह्यात बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन पक्षांच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत फारच कमी मते मिळाली. वंचित उमेदवार मताधिक्यापासून ‘वंचित’ राहिले. मनसेचे इंजिन चाललेच नाही. तर बसपच्या ‘हत्ती’ची चालही मंदावली. त्यामुळे आता बसपाचे अस्तित्व संपुष्टात आल्याचा सूर उमटू लागला आहे.
मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने 2004च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वच मतदारसंघांत उमेदवार दिले होते. या सर्व उमेदवारांनी लाखावर मते घेऊन काँग्रेसचे उमेदवार पाडण्यात त्यावेळी मोठी भूमिका बजावली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या प्रत्येक लोकसभा व आता विधानसभा निवडणुकीत बसपच्या ‘हत्ती’ची चाल फारच मंदावली.
या विधानसभा निवडणुकीत तर जिल्ह्यातील बसपच्या एकाही उमेदवाराला पाच हजार मतांचा पल्ला गाठता आला नाही. अनेक उमेदवारांना एक ते तीन हजार मते मिळाली. मागील काही वर्षांपूर्वीच्या मोठ्या निवडणुकीत लक्षणीय मते घेत अधूनमधून उलटफेर करणाऱ्या बहुजन समाज पक्षाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे. तर दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीने बसपची जागा घेतल्याचे आणि वंचितचे ‘राजकीय उपद्रवमूल्य’ कायम असल्याचे सिद्ध झाले.
बसपने यंदा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा वगळता अन्य सहा मतदारसंघांत उमेदवार उतरवले. मात्र, पक्षाला जेमतेम 4597 मते मिळाली. यावर कळस म्हणजे एकाही उमेदवाराला 1 हजाराचाही आकडा गाठता आला नाही. चिखली मतदारसंघात पक्षाला सर्वाधिक म्हणजे 977 मते मिळाली. मलकापूर 776, बुलढाणा 651, मेहकर 739, खामगाव 654 आणि जळगाव जामोद मतदारसंघात 800 मते मिळाली. अनेक अपक्षांना यापेक्षा जास्त मतदान मिळाले आहे. यामुळे पक्षाचे जिल्ह्यातील अस्तित्वच संपुष्टात आले आहे.
अवस्था खराब
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची अवस्थाही अशीच काहीशी आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराने एक लाखापेक्षा जास्त मते घेतली होती. मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार वसंत मगर यांची चांगलीच दमछाक झाली. त्याना 98 हजार 441 एव्हढं मतदान झालं. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही जळगाव जामोद आणि खामगाव विधानसभा मतदारसंघ वगळता वंचितचा एकही उमेदवार दहा हजार मतांपर्यंत पोहोचू शकला नाही. विधानसभा निवडणुकीतील कामगिरी पाहता आता लहान पक्षांचे अस्तित्व आता संपुष्टात आल्याचे चित्र आहे.
वंचित चे अस्तित्व आणि ‘राजकीय उपद्रवमूल्य’देखील कायम असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत पाऊण लाखापेक्षा जास्त मतदान घेणाऱ्या वंचितच्या उमेदवारांनी पाच मतदारसंघांतील निकालात निर्णायक भूमिका पार पाडली. याचा फटका अप्रत्यक्षपणे का होईना आघाडीच्या उमेदवारांना बसला आहे. या सात उमेदवारांना 78 हजार 558 मते मिळाली. चिखली मतदारसंघातील सिद्धेश्वर पवार (1308 मते), मेहकर डॉ. ऋतुजा पवार (2054) यांचा अपवाद वगळता अन्य पाच मतदारसंघात वंचितने चांगली मते घेत महाविकास आघाडीचे मतांचे समीकरण बिघडवून टाकले. बुलढाण्यात आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके जिल्ह्यात सर्वात कमी (841) मतांनी पराभूत झाल्या. येथे वंचितचे प्रशांत वाघोदे यांनी 7146 मते घेतली. निकालात हा निर्णायक घटक ठरला.
Mahayuti : दिग्गज नेते शिंगणे, बोन्द्रे, सानंदा, एकडे पराभूत, नवख्यांचा विजय !
वंचितला फटका
खामगावमध्ये वंचितचे देवराव हिवराळे यांनी 26 हजार 482 मते घेतली. याचा फटका काँग्रेसचे उम्मेदवार दिलीपकुमार सानंदा यांना बसला. भाजपचे अॅड. आकाश फुंडकर यांच्याकडून त्यांना 25477 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. मलकापूरमध्ये वंचितचे डॉ. मोहम्मद जमिर यांनी 9316 मते घेत काँग्रेसच्या पराजयात मोठा वाटा उचलला. जळगावमध्ये वंचितचे डॉ. प्रवीण पाटील यांनी 17648 मते घेतल्याने काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांच्या पराभवमध्ये भर पडली. सिंदखेडराजामध्ये वंचितच्या सविता मुंडे यांनी 16658 मते घेतल्याने तिरंगी लढतीत मोठा उलटफेर झाला. आघाडीचे उमेदवार माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या अनपेक्षित पराभवाला त्यांनी मोठा हातभार लावला.