Eighth Inning : आमदारकीच्य सात टर्म ‘नॉट आउट’ असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी आठव्या टर्ममध्ये सुरुवातीपासूनच दमदार प्रदर्शन सुरू केले आहे. निवडणुकीची आचारसंहिता संपताच प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी मुनगंटीवार यांनी बैठकींचा धडाका लावला आहे. निवडणुकीपूर्वी चंद्रपूरच नव्हे तर राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या मुद्द्यावर यशस्वी तोडगा मिळवून देणारे राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी सरसावले आहेत.
लष्करी अळी, तुडतुडा यांच्या प्रादुर्भावामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले आहे. या संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईतून चंद्रपुरातील अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये मुनगंटीवार यांनी लष्करी अळी, तुडतुडा तसेच अन्य पिक नुकसानीची भरपाई संदर्भात सविस्तर चर्चा केली.
शेतकऱ्यांच्या पाठीशी राहा
चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी कापणीच्या आधी पिकांवर पडलेल्या लष्करी अळी आणि तुडतुडा सारख्या रोगांमुळे झालेल्या पिक नुकसानीची भरपाई तातडीने देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. आपण स्वतः आणि महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अधिकाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी अशाच खंबीरपणे उभे राहावे, असे निर्देश यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
धान खरेदी संदर्भातही सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका कायम ठेवली. महाविकास आघाडीचे सरकार असताना सुधीर मुनगंटीवार यांनी धानाला बोनस मिळावा यासाठी, विधिमंडळाचे सभागृह दणाणून सोडले होते. मात्र आघाडी सरकारने आपला आडमुठेपणा कायम ठेवला. महायुतीचे सरकार आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुरावामुळे धानाला बोनस जाहीर झाला. धान खरेदी संदर्भातील नोंदणीला सुरुवात झाल्यानंतर पूर्व विदर्भात मोबाइल नेटवर्कची अडचण अनेक केंद्रांना भेडसावत होती. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः पाठपुरावा करत धान पिकाच्या नोंदणीची मुदत अनेकदा वाढवून घेतली होती. सरकारच्या या आदेशानंतरही धान खरेदी केंद्रांवर नोंदणी बंद ठेवणाऱ्यांना आता मुनगंटीवार यांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
Sudhir Mungantiwar: चंद्रपूरच्या ‘फ्लाइंग क्लब’ मधून आकाशात झेपावणार विमान
धान पिकाची नोंदणी बंद ठेवणाऱ्या आणि आपल्या कामात कुचराई करणाऱ्या संस्थावर, व्यक्तींवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीमध्ये दिल्या आहेत. शेतकऱ्यांची विनाकारण अडवणूक करणाऱ्यांना अजिबात पाठीशी घालू नका. दोषी असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर किंवा संस्थेवर कठोर कारवाई करा, असे निर्देशच सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही, असे सांगण्यात येत आहे.