Anis Ahmed : काँग्रेसमधून वंचितमध्ये आणि वंचितमधून पुन्हा काँग्रेसमध्ये असा सहा दिवसांचा अनिस अहमद यांचा प्रवास चांगलाच गाजला. विधानसभा निवडणुकीत मध्य नागपूरमधील नाट्यमय घडामोड घडली. काँग्रेसने परिषदेचे आश्वासन देऊन माजी मंत्री अनिस अहमद यांना शांत बसवले, अशी चर्चा होती. मात्र आता काँग्रेसच्या संख्याबळाचा विचार केल्यास अनिस अहमद अखेर वंचित राहणार, असेच चित्र आहे.
अनिस अहमद काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मंत्री होते. मध्य नागपुरात एकेकाळी त्यांचा दबदबा होता. 1995, 2004 आणि 2009 अशा सलग तीन निवडणुका त्यांनी जिंकल्या. त्यामुळे त्यांच्याशिवाय मध्य नागपूरला पर्याय नाही, असेच वाटत होते. त्यापूर्वी 1980 आणि 1985 या दोन निवडणुकाही मुस्लीम उमेदवारांनीच जिंकल्या होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या मध्य नागपुरात मुस्लीम आमदारांचे वर्चस्व होते. ही बाब भाजपला पचनी पडत नव्हती. अखेर जातीय समीकरणाच्या जोरावर मध्य नागपुरात भाजपचे विकास कुंभारे विजयी झाले.
विकास कुंभारे यांनी सलग तीन निवडणुका जिंकल्या आणि मुस्लीम उमेदवारांचे वर्चस्व संपुष्टात आले. 2019 मध्ये काँग्रेसने बंटी शेळके यांना संधी दिली. शेळके यांनी आपली क्षमता सिद्ध केली. यंदा अनिस अहमद यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली. पण त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि पुन्हा एकदा शेळकेंवरच विश्वास टाकण्यात आला. अनिस अहमद यांनी वंचित बहूजन आघाडीमध्ये प्रवेश घेत काँग्रेसला चेकमेट दिला.
अनिस अहमद वंचितकडून लढले असते तर आज बंटी शेळके यांना जी मते मिळाली आहेत, त्यात मोठी घट झाली असती. त्यामुळे अहमद यांना उमेदवारी दाखल करण्यापासून काँग्रेसने रोखले. अनिस अहमद शेवटच्या दिवशी उशिरा पोहोचले. त्यामुळे त्यांचा अर्ज दाखल झाला नाही. दोन दिवसांनी ते काँग्रेसमध्ये परत आले. त्यांना बंटी शेळके यांचा प्रचार करा, परिषदेत संधी देऊ, असे सांगण्यात आले, अशी चर्चा होती. आपलेच सरकार येणार आहे, असा विश्वास काँग्रेसला होता. मात्र, निकाल उलटाच लागला.
National convention : अजित पवार घेणार पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन !
पराभव..
काँग्रेसच्या हातून केवळ मध्य नागपूरच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र गेला. राज्यात केवळ 16 जागा काँग्रेसला जिंकता आल्या. परिषदेवर आमदार पाठविण्यासाठी काँग्रेसकडेच संख्याबळ नाही. त्यामुळे आता अनिस अहमद यांची वर्णी कशी लागणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा परिस्थितीत अनिस अहमद यांना कोणताच पक्ष विधान परिषदेवर पाठवू शकत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ करून घेतला, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.