Buldhana : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीने प्रचाराचा नारळ फोडला. निकालही आला, मात्र आलेल्या निकालाने संपूर्ण राज्याला धक्का बसला आहे. महायुतीने निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात सभा घेऊन फोडला होता. त्याच वेळी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे यांनीदेखील प्रचाराची सुरुवात कोल्हापूरातून केली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर याच जिल्ह्यातून नव्हे तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा राज्यातील 36 जिल्ह्यांपैंकी 23 जिल्ह्यांतून सुपडा साफ झाला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला कधी नव्हे ते अभुतपूर्व यश मिळाले आहे. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांपैकी तब्बल २३२ जागा महायुतीच्या पदरात पडल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त पन्नासचा आकडा गाठता आला आहे. यातच संसदेत विरोधी पक्षनेते पद असलेल्या कॉंग्रेसची या निवडणुकीत दाणादाण उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यातील 36 जिल्ंह्यापैकी तब्बल 23 जिल्ह्यांतून कॉंग्रेस हद्दपार झाली आहे.
महाविकास आघाडीच्या उम्मेदवाराच्या प्रचारासाठी राज्यात स्टार प्रचारक म्हणून राहुल गांधी, प्रियांका गांधी, नाना पटोले, मुकुल वासनिक, इम्रान प्रतापगडी, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आदींच्या जंगी सभा झाल्या. मात्र याचा काहीही परिणाम मतदारांवर झाला नसल्याचे दिसून आले. एकेकाळी राज्यावर निर्विवाद सत्ता राखणाऱ्या कॉंग्रेसची जबरदस्त पीछेहाट झाली आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीत शंभर पेक्षा अधिक जागा लढल्या होत्या. मात्र त्यांच्या वाट्याला फक्त 16 जागा आल्या. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेसला भोपळालाही फोडता आला नाही. त्याची आकडेवारी समोर येत आहे.
कॉंग्रेसने महाराष्ट्रला अनेक काळ मुख्यमंत्री दिले आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांचाच पराभव झाला आहे. कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपच्या अतुल भोसले यांनी पराभव केला आहे. याचसोबत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हेही पराभूत झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यामध्ये नाव असलेले नाना पटोले हे मात्र अवघ्या 208 मतांनी निवडून आले. त्यांच्यावरही मोठी नामुष्की ओढवली आहे.
धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, वर्धा, गोंदिया, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, बीड, धाराशीव, सोलापुर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापुर या जिल्ह्यांत कॉंग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.