Election Commission Of India : विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्र आणि संपत्तीच्या माहितीच्या आधारे साजिद खान पठाण हे राज्यातील सगळ्यात गरीब उमेदवार ठरले आहेत. खान यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. या निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. राज्यभरातील 288 विजयी उमेदवारांपैकी सगळ्यात कमी संपत्ती खान यांच्या नावावर आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्राच्या आधारे साजिद खान पठाण यांच्याकडे केवळ नऊ लाख रुपयांची संपत्ती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सर्वच उमेदवार करोडपती आहेत. शपथपत्राच्या आधारे देण्यात आलेल्या माहितीवर प्रकाश टाकल्यास शिवसेना एकनाथ शिंदे गटाचेही जवळपास सर्वच उमेदवार कोट्यधीश आहेत. भाजपचे काही उमेदवार त्यादृष्टीने कमकुवत आहेत. 288 पैकी 188 उमेदवारांविरद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांनीच दिलेल्या शपथपत्रातून उघड झाली आहे. यात बलात्कार, महिलांवर अत्याचार, हत्या, प्राणघातक हल्ला, भ्रष्टाचार या गुन्ह्यांचा समावेश आहे.
भाजपवर जास्तु गुन्हे
आकडेवारीनुसार भाजपच्या 132 पैकी 92 उमेदवारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील निम्मे गुन्हे अत्यंत गंभीर स्वरुपाचे आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 38 आमदार असे आहेत, ज्यांच्या विरोधात अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप व गुन्हे आहेत. शिवसेनेच्या एकूण 57 उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल असून त्यावर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनीच शपथपत्रात दिली आहे. 47 उमेदवारांविरुद्ध अतिगंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदले गेले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 20 पैकी 13 उमेदवारांच्या गुन्ह्यांबाबत तपास सुरू आहे. काँग्रेसचे नऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच उमेदवार फौजदारी गुन्ह्यात आहेत. अशीच परिस्थिती देशाच्या संसदेतही आहेत. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले 93 टक्के खासदार कोट्यधीश आहेत. यामध्ये देशात अव्वल क्रमांक आंध्र प्रदेशातील गुंटुर जिल्ह्यातील तेलगू देसमचे खासदार चंद्रशेखर पेम्मासानी यांचा आहे. त्यांच्या मालमत्तेची किंमत 5 हजार 705 कोटी रुपये होती. ही किंमत 2024 मधील निवडणुकीच्या पूर्वीची आहे. दुसऱ्या क्रमांकावर तेलंगणातील खासदार आहेत. चेवेल्लाचे भाजप खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी हे त्यांचे नाव. त्यांची मालमत्ता 4 हजार 565 कोटी रुपये आहे.
तिसऱ्या क्रमांकावर हरियाणातील कुरूक्षेत्रचे भाजप खासदार नवीन जिंदाल हे आहेत. त्यांच्याकडे 1 हजार 241 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. देशाच्या संसदेत एकूण 504 खासदारांपैकी 475 खासदार कोट्यधीश आहेत. भाजपचे 95 टक्के म्हणजे 227 खासदार कोट्यधीश आहेत. काँग्रेसचे 92 म्हणजे 95 टक्के खासदार कोट्यधीश आहेत. ‘आप’चेही तीन खासदार मालामाल आहेत. केवळ एक टक्के खासदार असे आहेत, ज्यांची संपत्ती 20 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. एकूण 46 टक्के खासदारांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.
Assembly Election : पुसदच्या बंगल्याची 72 वर्षांची राजकीय परंपरा
गुन्ह्यांमध्ये वाढ
राजकारणाचं गुन्हेगारीकरण वाढत आहे. 2014 मध्ये 185 खासदारांविरुद्ध गुन्हे होते. 2009 मध्ये ही संख्या 162 होती. 2004 मध्ये 125 होती. त्यामुळे 2009 पासून राजकीय क्षेत्रात गुन्हे दाखल असलेल्या बाहुबलींची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे. विधानसभेप्रमाणेच अनेक खासदारांवरही बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांवरील गुन्ह्यांसह गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकूण खासदारांपैकी 420 खासदार पदवीधर आहेत. 19 टक्के खासदार केवळ दहावी किंवा बारावी पास आहेत.