Assembly Election : बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. काल (25 नोव्हेंबर) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुनील कोल्हे गंभीर जखमी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील दोन गटांतील संघर्षाची घटना ताजी असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दोन वेगवेगळ्या बाईकवरून आलेल्या चार जणांनी रॉडने कोल्हे यांच्यावर तालखेड फाट्यावर हल्ला केला. हल्लेखोर तोंडावर रूमाल बांधून होते. सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या आसपास हा हल्ला करण्यात आला. मोताळा तालुक्यातील तालखेड ते तालखेड फाट्यादरम्यान ही घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत सुनील कोल्हे यांच्यावर मोताळा येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. त्यांचा डावा हात आणि डावा पाय ‘फॅक्चर’ झाल्याची माहिती आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या तथा नुकतेच पार पडलेल्या बुलढाणा विधानसभेच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके या जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. महाविकास आघाडीचे अन्य नेते, पदाधिकारीदेखील रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जयश्री शेळके यांनी केली आहे.
महाविकास आघाडीचे ज्यांनी प्राणपणाने काम केले, अशा लोकांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. निकालाच्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार सुरु असल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने अशा हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. बुलढाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याची मागणी जयश्री शेळके यांनी केली आहे. दरम्यान, कोल्हे यांना पाहण्यासाठी अनेकांनी जिल्हा रुग्ण्यालयाकडे धाव घेतली.