Assembly Election : विधानसभा निवडणुकीत बुलडाणा जिल्ह्यात भाजप शिवसेना महायुतीने निर्विवाद वर्चस्व कायम राखले. 7 पैकी 6 जागा महायुतीने जिंकल्या. आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्याला यावेळी दोन मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये महायुतीच्या 6 पैकी 4 आमदांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा सुरु आहे. यातील कुणाला संधी मिळणार, याकडे कार्यकत्यांचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत राज्यात महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातही महायुतीने दमदार कामगिरी केली. सात पैकी सहा जागा जिंकल्या आहेत. यामध्ये भाजपने सर्वाधिक चार जागा जिंकल्या आहेत. शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा प्राप्त झाली आहे. निवडणूक निकाल जाहिर होवून दोन दिवस उलटले. सत्ता स्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. मंत्रिपदाचे वाटप करताना पक्षीय बलाबल, जिल्हानिहाय समतोल, महिलांना संधी, आमदारांची कामगिरी आदी बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत. यावेळी बुलढाणा जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळणे पक्के आहे. जिल्ह्याला दोन मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
शिंदे सरकारच्या कालावधीत बुलढाणा जिल्ह्याला मंत्रिमंडळातून डावलण्यात आले होते. त्यामुळे यावेळी जिल्ह्यात लाल दिवा येणार हे निश्चीत आहे. मंत्रिपदासाठी महायुतीच्या चार आमदारांच्या नावांची चर्चा होत आहे. यामध्ये जळगाव जामोद मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आलेले भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ मोठ्या मताधिक्क्याने सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले भाजपचे आकाश फुंडकर यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे.
अपेक्षा
खामगावातील भाजप कार्यकर्त्यांना खामगावात लाल दिवा मिळावा, अशी अपेक्षा आहे. सोशल मिडियावर याबाबत पोस्ट टाकल्या जात आहेत. भाजपच्या चिखली येथील आमदार श्वेता महाले यांचेही नाव मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहे. त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे. श्वेता महाले या सक्रिय महिला आमदार आहेत. याचा त्यांना मंत्रिपद मिळण्यासाठी फायदा होण्याची शक्यता आहे.
Mahayuti 2.0 : दादा मुख्यमंत्री; कोते पाटील म्हणतात, अशक्य असं काहीच नाही!
संजय गायकवाड
बुलढाणा विधानसभेतून दुसऱ्यांदा निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे चर्चीत आमदार संजय गायकवाड यांच्याही नावाचीही मंत्रिपदासाठी चर्चा होत आहे. महायुतीच्या या चार आमदारांपैकी कोण नामदार होणार, याची आता कार्यकत्यांना उत्सुकता लागली आहे. येत्या एक-दोन दिवसांत राज्यात नवे सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागते, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरत आहे.