ऑल इज वेलचा दावा करत असलेल्या जिल्हा प्रशासनाच्या घाेडचुकीमुळे ज्येष्ठ इतिहासकार व पुराेगामी विचारवंत प्रा. मा. म. देशमुख यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. आयोगाच्या घाेळाचा फटका बसला व सरकारदरबारी मृत असल्याचे चित्र त्यांना याचि देही याचि डाेळा अनुभवावे लागले. मतदानासाठी गेलेल्या प्रा. देशमुखांना मतदार यादीत जिवंतपणीच मृत दाखविण्यात आले हाेते.
खामल्याच्या काेतवालनगर, व्यंकटेशनगर येथील रहिवासी 87 वर्षीय प्रा. मा. म. देशमुख यांचे मतदान साेमलवार हायस्कूल, खामला येथे बूथ क्रमांक 219 वर हाेते. निवडणूक आयाेगाच्या निर्देशानुसार वयाेवृद्ध नागरिकांसाठी असलेल्या व्यवस्थेचा लाभ त्यांनी घेतला. ते आपल्या पत्नीसह मतदान केंद्रावर पाेहोचले. पत्नीचे मतदान बराेबर झाले, पण मतदार यादीत प्रा. देशमुख यांच्या नावासमाेर चक्क ‘मृत’ असल्याची नाेंद केली गेली हाेती. मतदान कर्मचाऱ्यांनी त्यांना मतदानापासून राेखले. ‘मी तुमच्यासमाेर जिवंत उभा असताना मला मृत कसे दाखविता’, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे केंद्रावरील कर्मचाऱ्यांचीही भांबेरी उडाली.
त्यानंतर केंद्रावरील अधिकाऱ्यांनी प्रा. देशमुख यांनी 17 क्रमांकाचा फार्म भरण्यास सांगितले. ताे फार्म भरल्यानंतर पुन्हा प्रतिज्ञापत्र करायला सांगितले. ‘मीच मा. म. देशमुख आहे. ही माहिती चुकीची आढळल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई करावी’ असे नमूद असलेले प्रतिज्ञापत्र त्यांना भरून द्यावे लागले. किमान तास ते दीड तास या वयाेवृद्ध इतिहासकारासाेबत हा प्रकार चालला. अखेर प्रतिज्ञापत्र भरून दिल्यानंतर त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला. मात्र यासाठी त्यांना व त्यांच्या पत्नीला माेठा मनस्ताप सहन करावा लागला.
Shiv Shiv : केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी शिवसैनिकांसमावेत बघितला “द साबरमती रिपोर्ट ”
नेमके काम कोणते झाले?
लोकसभेतील घोळानंतर मतदार यादीच्या संदर्भात प्रशासनाने काळजीपूर्वक काम केल्याचा दावा करण्यात आला. पण प्रत्यक्ष मतदानाची वेळ आली तेव्हा नवीनच घोळ पुढे आले. मतदार यादीमध्ये जीवंत लोकांना मृत दाखविण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील चार मृतांची नावे गेल्या दहा वर्षांपासून वगळण्यातच आलेली नाहीत. दुसरीकडे काही मतदारांनी मूळ गावातून नाव काढून नवीन ठिकाणी नोंदणी केली आहे. अशांची नावे गावात आणि शहरात अशा दोन्ही ठिकाणी आहेत. त्यामुळे प्रशासनाने नेमके काम कोणते केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.