Nagpur : नागपूर मध्यचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर काही ना काही कारणाने राडा केल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. अगोदर कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत वाद घातला व त्यानंतर रात्री ईव्हीएम नेणाऱ्या गाडीवर हल्ला केला. मात्र दरम्यान बूथवरून पैसे वाटप झाल्याने बंटी शेळके यांचा एक बूथदेखील सील करण्यात आला. नागपुरात कुठेही काँग्रेसवर अशी नामुष्की ओढवलेली नाही.
नागपूर मध्य मध्ये सकाळपासून मतदानाला सुरुवात होताच जागोजागी वादाच्या ठिणग्या पडायला सुरुवात झाली. सकाळी आठच्या सुमारास शाहीद बेकरीजवळच्या मतदान केंद्राशेजारी बॅरिकेड्स लावण्यावरून काँग्रेस उमेदवाराकडून आक्षेप घेतल्यामुळे वाद वाढला. तो निवळत नाही तोच रझा कॉम्प्लेक्सजवळ टेबल लावण्यावरून वाद झाला. दुपारी 12 च्या सुमारास भाजपा कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप करून अपक्ष उमेदवारांनी ‘बॅट’ हातात घेतल्याने तणाव निर्माण झाला.
तर, एक वाजताच्या सुमारास टीमकी दादरा पुलाजवळ, दुपारी चारच्या सुमारास हंसापुरी नालसाब चाैकाजवळ आणि श्रीराम स्वामी मंदिराजवळही वादाचे, आरोप प्रत्यारोपाचे प्रकार घडले. हे सर्व सुरू असतानाच बांगलादेश नाईक तलाव पोलिस चाैकीजवळ असलेल्या बंटी शेळके यांच्या बूथवरच्या रूममध्ये महिलांना बोलवून पैशाचे लिफाफे दिले जात असल्याची तक्रार झाली. भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत तेथे जाऊन येथून पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला. यानंतर दोन्हीकडचे समर्थक आमनेसामने आल्याने तेथे मोठा तणाव निर्माण झाला.
परिणामी सहपोलीस आयुक्तांसह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी, मोठ्या ताफ्यासह धडकले. विभागाच्या भरारी पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी शेळके यांच्या बूथवरची ‘ती रूम’ सील केली. पाच ते सात जणांना ताब्यातही घेतले. राजकारणात उमेदवाराकडून निवडणूक प्रक्रियेप्रति सन्मानाची वागणूक अपेक्षित असते. मात्र बंटी यांनी अपरिपक्वतेचे उदाहरणच जनतेसमोर मांडले आहे.
प्रियंकांच्या रॅलीपासून वाढला तणाव
बंटी शेळके मध्य नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांची मध्य नागपुरात रॅली निघाली. या रॅलीमध्ये भाजप व काँग्रेस कार्यकर्ते भिडल्याने प्रियंका यांना गाडीत बसून निघून जावे लागले. पण त्या रॅलीपासूनच भाजप आणि काँग्रेसमधील तणाव वाढत गेला. या तणावाचे पडसाद मतदानाच्या दिवशी दिसतील, याचा अंदाज पोलिसांना होता. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला जाईल, असे पोलिसांनाही वाटले नव्हते.