Voting : अतिउत्साह आणि अतिआत्मविश्वास याचा सर्वाधिक अनुभव राजकारणात येतो. ‘आपणच विजयी होणार’, ‘आपलाच माहोल आहे’, ‘लोकांना बदल हवा आहे’ आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ‘लोकांचं माझ्यावर प्रेम आहे’ अशाप्रकारची वाक्य आपण पुढाऱ्यांच्या तोंडून ऐकत असतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र अनेक पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयानंतरच्या जाहिराती बुक करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे विजयापूर्वीच जल्लोषाची तयारी सुरू झाल्याचे दिसत आहे.
यंदाच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरांमुळे वेगळे चित्र पहायला मिळणार आहे. एकतर प्रस्थापितांना धक्के बसतील किंवा बंडखोर बाजी मारतील, अशी परिस्थिती आहे. यात रामटेक विधानसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा होती. कारण याठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीसह दमदार अपक्ष उमेदवारही रिंगणात होते. यामध्ये माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे नाव आघाडीवर होते. मुळक यांनी रामटेकची लढत रंगतदार केली, अशी चर्चा सुरू झाली. यामध्ये पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी भर घातली.
महायुतीने शिंदे गटाचे आशीष जयस्वाल यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपचे मल्लिकार्जून रेड्डी विरोधात गेले. ते निवडणूक लढले नाहीत, पण शांतही बसले नसतील. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये राजेंद्र मुळक यांना ही जागा काँग्रेसकडे पाहिजे होती. ते दहा वर्ष या भागात काम करत आहेत. त्यामुळे आपण निवडून येऊ असा विश्वास त्यांना होता. मात्र ही जागा उद्धव गटाकडे गेली. त्यांनी विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली. पण आदिवासी संघटना, प्रहार जनशक्ती यांनी मुळक यांना पाठबळ दिले. त्यामुळे त्यांचे वजन वाढले.
रामटेकमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाल्यामुळे मुळक यांना विजयाचा विश्वास वाटत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून वर्तमानपत्रांच्या कार्यालयांमध्ये जाहिरातींचे बुकींग करण्याकरिता फोन जायला लागले आहेत. मतदान आटोपून अवघे काही तास झालेले असतानाच जाहिरातींचे बुकींग होऊ लागल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. विजयोत्सवाची एवढी घाई कोणत्या आधारावर सुरू आहे, असा सवालही लोक उपस्थित करत आहेत. पण रामटेकमध्ये चांगले मतदान होणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते, असा विश्वास मुळक यांना असावा.
Assembly Election : बुलढाणा जिल्हा सत्तर पार; सरासरी 70.32 टक्के मतदान
काँग्रेसचे नेते पाठिशी
राजेंद्र मुळक यांनी अपक्ष बॅटिंग केली असली तरीही त्यांच्या पाठिशी माजी मंत्री सुनील केदार आणि खासदार श्यामकुमार बर्वे उभे होते. या दोघांनी मुळक यांच्यासाठी रामटेक विधानसभा क्षेत्रात सभाही घेतल्या. दोघांच्या तक्रारी काँग्रेस नेत्यांकडे आणि उद्धव ठाकरेंकडे झाल्या आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मुळक यांना महाविकास आघाडीचा छुपा पाठिंबा असल्याचीही चर्चा होऊ लागली. अशा परिस्थितीत मुळकांना विजयाचा आत्मविश्वास असणे गैर नाही, असे बोलले जात आहे.