BJP Vs NCP : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नागपूर जिल्ह्यात हल्ला झाला आहे. त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. त्यात ते जखमी झाले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. देशमुख यांच्या बाबतचे काही फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. काटोल येथे प्रथमोपचार केल्यानंतर देशमुख यांना नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. न्यूरोसर्जन डॉ.आदित्य अटल यांनी त्यांची तपासणी केली. देशमुख यांच्या मेंदूचे सिटीस्कॅन नॉर्मल आले आहेत. त्यामुळे त्यांना आता रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, देशमुख यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांच्या कपाळावर जखम होती. मात्र ही जखम फार खोल नव्हती. दगडफेक झाल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून सिटीस्कॅन करण्यात आलं. मात्र सगळेच रिपोर्ट नॉर्मल आलेत. देशमुख यांच्यावरील हल्ल्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे युद्ध पेटले आहे. अशात हल्ल्याबाबत भाजप नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांनी संशय व्यक्त केला आहे.
फोटोवरून संशय
अनिल देशमुख यांच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्याच टीमकडून घटनेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्यात आलेत. आता याच व्हिडीओ, फोटोंचा वापर भाजपनं केला आहे. देशमुख यांच्या वाहनाचे फोटो दाखवत वाघ म्हणाल्या, आपल्यात्या काहीही म्हणायचे नाही. वाघ म्हणाल्या बोनेटवर प्रचंड मोठा दगड आहे. पण बोनेटला काहीच झालेलं नाही. या फोटोत अनिल देशमुख यांनाही कुठली जखम दिसत नाही. एक व्यक्ती फोटो काढत असल्याचं साइड मिररमध्ये दिसतो. ज्यांना समजायचे ते समजलं आहे, असं वाघ यांनी नमूद केलं.
देशमुख यांच्यावरील हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम संशयास्पद असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेनंतर महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी एकापाठोपाठ देशमुख यांचे व्हिडीओ व्हायरल केले. या सगळ्यांनीच भाजपवर टीका केली. हल्लेखोर पकडले गेलेले नाहीत. हल्ला कोणी केला हे अस्पष्ट आहे. अशात महाविकास आघाडीमधील नेत्यांनी हा हल्ला भाजपनंच केला असा दावा केल्या जात असल्याचंही भाजपकडून सांगण्यात येत आहे.
देशमुख यांच्या वाहनांचे ठराविकच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्यात आले आहेत. त्यामुळं संशयाला बराच वाव आहे. देशमुख यांच्या वाहनाच्या अगदी मागे कार्यकर्त्यांची जीप होती. त्यामुळं इतके सगळे कार्यकर्ते चार हल्लेखोरांना पकडू शकले नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दगडफेकीनंतर हल्लेखोर शेतात पळाले असं सांगण्यात येत आहे. शेतातील रस्ता पळण्यासाठी अगदी सपाट असतो का? शेतात नाले, काटे वैगरे नसतात का? असा प्रश्नही भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे.