Bjp : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून राजकारण तापले असतानाच माजी राज्यमंत्री व भाजपचे नेते आ.परिणय फुके यांनी हा हल्लाच बनावट असल्याचा दावा केला आहे. अनिल देशमुखांकडून असा प्रकार होऊ शकतो असे भाकित मी अगोदरच प्रचार सभांमध्ये वर्तविले होते. लोकांची सहानभूती मिळविण्यासाठी हा ड्रामा करण्याच आल्याचा आरोप फुके यांनी लावला.
सतर्क केले
काटोलमधील जनतेला मी याबाबत अगोदरच सतर्क केले होते. ही दगडफेक होणार असे भाकित मी अगोदरच केले होते. याबाबतचे विविध फोटो पाहिले की यातील फोलपणा लक्षात येत आहे. १० किलोंचा दगड त्यांच्या कारवर पडलेला दिसतो आहे. मात्र १० फुटांवरुन सामान्य व्यक्ती १० किलोंचा दगड फेकून मारू शकत नाही. काटोलच्या शेतकऱ्यांना याची जाण आहे. इतका मोठा दगड कारच्या बोनेटवर पडला असताना कारला तेथे स्क्रॅचदेखील लागलेली नाही. काचदेखील पूर्ण न फुटका काचेला भेगा पडल्या आहेत. पॅसेंजर सीटच्या खालीदेखील एक दगड ठेवलेला दिसत आहे. या सर्व बाबी संशयास्पद आहेत. मागील २५ वर्षांपासून अनिल देशमुख यांनी जनतेशी दिशाभूल केली. मुलाला जिंकविण्यासाठी त्यांनी बनावट दगडहल्ला त्यांनी करवून आणला आहे, असा दावा फुके यांनी केला.
भाजप गुंडगिरी करणारा पक्ष – सलील देशमुख
वडिलांवरील हल्ल्यानंतर काटोलचे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार सलील देशमुख यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप हा गुंडगिरी करणारा पक्ष आहे. गुंडांना पाठिशी घालण्याची भाजपची जुनी परंपरा आहे. राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य नागरिक, महिला कसे सुरक्षित राहतील, असा आरोप सलील देशमुख यांनी केला आहे. भाजपच्या विरोधात जाणाऱ्यांचे डोके फोडणे, ठेचून काढणे हेच काम महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे. कारण या लोकांना अमित शाह, देवेंद्र फडणवीस आपल्या सोबत आहेत, याची पूर्ण खात्री आहे. भाजपची सर्वत्र नाचक्की होत आहे. प्रत्येक ठिकाणी भाजपला आपला पराभव दिसत आहे, असेही सलील देशमुख यांनी म्हटले आहे.
ऐन मतदानापूर्वी राजकारण तापले
जाहीर प्रचार थांबल्यानंतर छुपा प्रचार सुरू झाला होता. आता एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोपाला मर्यादा आलेल्या होत्या. पण अशात देशमुखांवर हल्ला झाल्यानंतर ऐन मतदानाच्या 48 तास आधी राजकारण तापले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.