Assembly Election : अधंश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते प्रा. श्याम मानव हे खोटं बोलत आहेत. प्रकाश आंबेडकर आणि राहुल गांधी यांची भेट झालेलीच नाही. मात्र यासंदर्भात प्रा. मानव दावा करीत सुटले आहेत. हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी दिले आहे. राहुल गांधी आणि वंचित बहुजनआघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट झाल्याची माहिती सांगणारा प्रा. श्याम मानव यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर आला आहे. या पार्श्वभूमीवर मोकळे यांनी मानव यांचा खोटेपणा उघड केला आहे.
आंबेडकर रुग्णालयात दाखल होते. आयसीयूमध्ये होते. त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्याबद्दल मीडियामधून कुत्सित, हेटाळणी करणारे वक्तव्य केले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या ‘ट्रोल गँग’ने मेडिकल बुलेटिन खाली मरणाच्या संदर्भातील घाणेरड्या कमेंट केल्या. 16 तारखेपर्यंत यांना कोणालाही आंबेडकर यांच्या तब्येतीची विचारपूस करावी असे वाटले नाही, अशी टीका मोकळे यांनी केली.
खोटे अश्रू
महाराष्ट्रातील संस्कृतीच्या नावाने काही लोक गळा काढत आहेत. हे अश्रू खोटे आहेत. आंबेडकर आयसीयूमधून बाहेर येऊन प्रचार करत आहेत. वंचितचे उमेदवार एक नंबरवर आहेत. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा वरातीमागून घोडे आले. त्यामुळे राहूल गांधी यांना आंबेडकर यांच्या तब्येतीची विचारपूस करावी असं वाटलं. त्यामुळंच त्यांनी फोन केल्याचा दावा मोकळे यांनी केला. हा संवाद केवळ 31 सेकंदाचा होता, असेही ते म्हणाले. मात्र राहुल गांधी आणि आंबेडकर यांची कोणतीही भेट झालेली नाही. त्यामुळे मानव नावचे महाशय ठोकून देत आहेत की, हे दोघेही भेटले.
राहुल गांधी देशाचे नेता, व्यस्त नेता असल्याचं दाखविण्यात येतं. राहुल वेळ काढत आंबेडकरांना भेटला असं दाखविण्यात येत आहे. त्यातून राहुल किती महान, किती ग्रेट आहे हे दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या पायाचे तळवे चाटण्याचा हा प्रकार असल्याचंही मोकळे म्हणाले. हे लोकं घराणेशाहीला पोसण्याचे काम करीत आहेत. त्यांनी ते खुशाल करावं. वंचितला त्याच्याशी देणंघेणं नाही. पण त्यांनी आंबेडकर यांच्याबाबत खोटं बोल नये, असा इशारा मोकळे यांनी दिला.
Chandrashekhar Bawankule : पवारांच्या नादी लागण्यापुरता वेळ नाही
पाया पडणार नाही
वंचित बहुजन आघाडी कोणाच्याही दारात जाणार नाही. कोणाशी बोलणी करणार नाही. वंचित बहुजन आघाडी दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिमांची मोट बांधत आहे. त्यांना एकत्र घेऊन स्वतंत्र निवडणूक लढत आहे. आंबेडकर यांनी हे स्वतः जाहीर केले आहे. वंचित मैदानात उतरली आहे. ताकदीने लढत आहे. अनेक ठिकाणी वंचितचे उमेदवार प्रचारात पुढे आहेत. विजयाच्या दिशेने आगेकूच करीत आहेत, असं सिद्धार्थ मोकळे यांनी नमूद केलं. त्यामुळं मतदारांना भ्रमीत करणारी विधानं केली जात आहेत. ‘खोटे नेरेटिव्ह’ पसरविणारे व्हिडीओ टाकले जात आहेत. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीने प्रा. श्याम मानव यांचा निषेध केला आहे. पुन्हा असा प्रयत्न केला तर त्यासंदर्भातील इशाराही वंचितने दिला आहे.