BJP vs congress : लोकसभा निवडणुकीत देशभराचे लक्ष रामटेक लोकसभा मतदारसंघाकडे लागलेले होते. कारण तेथे रश्मी बर्वे यांची उमेदवारी अवैध ठरवण्यात आली होती. तेव्हा त्याचे पती श्यामकुमार बर्वे यांचा अर्ज कायम राहिला. तसे पाहता श्यामकुमार अगदी नवखे. तरीही सुनील केदार यांनी त्यांनी निवडून आणलेच. अगदी तशीच काहीशी स्थिती या निवडणुकीत रामटेक विधानसभा मतदारसंघात उत्पन्न झाली आहे.
रामटेक मतदार संघात केदार
काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी त्यांचा उमरेड हा मतदारसंघ आरक्षणात गेल्यानंतर सातत्याने रामटेक विधानसभा मतदारसंघात मशागत केली. गेल्या पाच वर्षांत त्यांनी येथे अथक परिश्रम घेतले. ऐन वेळेवर ही जागा महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सुटली. त्यामुळे मुळक यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला. नंतर त्यांनी सुनील केदार यांच्यासोबत मातोश्रीही गाठली. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना केदारांचा मजबूत साथ लाभली.
मुळात उबाठाचे उमेदवार विशाल बरबटे हे तेवढे दमदार उमेदवार नाहीत. गेल्या काही काळापासून रामटेकमध्ये घर घेऊन राहणे, याशिवाय दुसरे त्यांचे काही कर्तृत्व दिसत नाही. याशिवाय बरबटेंनी ठाकरे गटाच्या काही जुन्या जाणत्या नेत्यांना डावलले. भेट टाळणे, सभेत न बोलावणे, असे प्रकार केले. आता तेच बरबटेंच्या अंगलट आले आहे. प्रकाश जाधव रामटेकचे खासदार होते. त्यांना बरबटेंनी काहीच महत्व दिले नाही. त्यामुळे आता त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याचे सूत्र सांगतात. विशेष म्हणजे कन्हान, टेकाडी या भागात जाधव यांचा चांगला दबदबा आहे. ते ज्या उमेदवारासोबत राहतील, त्या उमेदवाराचा विजय दृष्टीक्षेपात येईल, असेही सांगितले जात आहे.
दुसरीकडे उबाठाचे मौदा तालुक्यातील नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले पक्षातच नाराज होते. त्यांना केदारांनी काँग्रेसमध्ये आणले. याचाही फटका बरबटेंना बसणार आहे, हे निश्चित. याशिवाय रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचे विद्यमान आमदार अॅड. आशिष जयस्वाल यांच्याशी अजिबात पटत नाही. इतके की, त्यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यामुळे रेड्डींनी बरबटेंना साथ द्यायची, असे आधी ठरवले होते. पण बरबटे विनिंग कॅंडीडेट नाही, असे जेव्हा त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी आपला मोर्चा राजेंद्र मुळक यांच्याकडे वळवल्याचीही माहिती आहे. कारण कुठल्याही परिस्थितीत रेड्डींना जयस्वाल नको आहेत.
मुळक वाटेवर
गोंडवाणा गणतंत्र पार्टीचेही येथे चांगले काम आहे. गोंगपासुद्धा मुळकांच्याच वाटेवर असल्याची माहिती आहे. याशिवाय मतदारसंघांची पुनर्रचना होण्यापूर्वी पारशिवणी तालुक्याचा एक मोठा पट्टा सुनील केदार यांच्या सावनेर विधानसभा मतदारसंघात होता. येथे केदारांचे अजूनही घट्ट संबंध आहेत. केदारांचे नेटवर्क अजूनही येथे काम करत आहे. त्याचाही फायदा राजेंद्र मुळक यांना होणार आहे. या मतदारसंघातील सर्व घडामोडींचा फायदा सुनील केदार यांनी पद्धतशीरपणे घेतला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे सुनील केदारांनी निवडणूक अंगावर घेतली म्हणजे काम फत्ते, असे त्यांच्याबाबतीत बोलले जाते. त्यामुळे सुनील केदारांनी जेव्हा मुळक यांना साथ दिली, तेव्हाच ही जागा मुळकांची झाली होती, असेही राजकीय जाणकार सांगतात.
पक्की झाली दोस्ती
एके काळी केदार आणि मुळक यांच्यातही पटत नव्हते. पक्की दुश्मनी होती. पण या दोघांचाही दुष्मन (राजकीय वैरी) आशिष जयस्वाल आहे. त्यामुळे ‘आपली दुश्मनी आपण नंतर बघू, याला (आशिष जयस्वाल) आधी निपटवू’, असा अलिखित करार केदार आणि मुळक यांच्यात झाला. आणि या दोघांनी आशिष जयस्वाल यांची चांगलीच फिल्डींग लावली. आज सायंकाळी 5 वाजता जाहिर प्रचार थांबणार आहे. त्यानंतर छुपा प्रचार सुरू होईल. उद्या (19 नोव्हेंबर) ‘कत्ल की रात’ आहे. यामध्ये केदार चांगलेच खिलाडी आहेत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेतही केदार आपला उमेदवार निवडून आणतील. पक्षात त्यांचे वजन आणखीन वाढेल, असे राजकीय जाणकार सांगतात.