महाराष्ट्र

Assembly Election : गडकरींच्या 13 दिवसांत 72 सभा!

Nitin Gadkari : भाजप-महायुतीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र पालथा

BJP : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अवघ्या 13 दिवसांमध्ये महाराष्ट्र पालथा घातला. महायुतीच्या उमेदवारांसाठी 13 दिवसांमध्ये रोडशोजसह तब्बल 72 सभा गडकरींच्या नावे होतील. सोमवारी (दि.18 नोव्हेंबर) अखेरच्या दिवशी देखील ते चार जाहीर सभा घेणार आहेत.

गेल्या दोन आठवड्यांपासून अख्खा महाराष्ट्र गडकरींच्या सभांचा झंझावात आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद अनुभवत आहे. महायुतीच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी गडकरी यांनी दररोज सरासरी सात सभांना संबोधित केले, हे विशेष. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई असा जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र गडकरींनी पालथा घातला.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी गडकरी भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभर त्यांचा प्रचारदौरा होणार हे आधीच निश्चित होते. त्यानुसार 4 नोव्हेंबरला नागपूरमधून त्यांच्या सभांना सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दक्षिण, पूर्व आणि मध्य नागपुरात त्यांच्या सभा झाल्या. त्यानंतर 7 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी नॉन स्टॉप जाहीरसभा घेतल्या. गडचिरोली ते मुंबई अख्खा महाराष्ट्र त्यांनी पालथा घातला.

गडकरी यांच्या अमोघ वक्तृत्वामुळे सर्व ठिकाणी त्यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. महायुतीला त्यांच्या प्रचारामुळे मोठे बळ मिळाले आहे. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीला गडकरी यांच्या प्रचारसभांचा मोठा फायदा होईल, असा विश्वास भाजप परिवारातून व्यक्त होत आहे.

एकाच दिवशी आठ सभा!

दि. 9 नोव्हेंबरला तर कारंजा-घाडगे, पुलगाव, समुद्रपूर, वर्धा, हिंगणघाट आणि हिंगणा (बुटीबोरी) अशा सहा मतदारसंघांमध्ये एकाच दिवशी त्यांनी सभा घेतल्या. दि. १५ नोव्हेंबरला एकाच दिवशी आठ मतदारसंघांमध्ये सभा घेऊन त्यांनी सर्वांना थक्क केले. या दिवशी आष्टी, कुरखेडा, नागभीड, उमरेड, कामठी, दक्षिण नागपूर, मध्य नागपूर व पूर्व नागपूर अशा आठ मतदारसंघांमध्ये त्यांनी सभा घेतल्या.

Sudhir Mungantiwar : महाविकास आघाडीने फक्त ‘टाइमपास’ केला!

अखेरच्या दिवशीही चार सभा

दि. 18 नोव्हेंबरला (सोमवार) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी 5 वाजता प्रचार थांबणार आहे. अखेरच्या दिवशी देखील गडकरी यांच्या चार सभा होणार आहेत. यातील दोन सभा गोंदियातील सडक अर्जुनी व तिरोडा येथे तर प्रत्येकी एक सभा आणि कामठीत एक व मध्य नागपुरातील गोळीबार चौकात एक अशा चार सभा होणार आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!