Political Campaigning : अकोल्यात सध्या राजकीय प्रचार शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहे. निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा थेट हिंदू-मुस्लिम या भोवतीच केंद्रीत झाला आहे. या सर्व परिस्थितीत अपक्ष उमेदवार हरीश अलीमचंदानी यांच्या रॅलीत घडलेल्या एका प्रकारानं सारेच थक्क झाले आहेत. त्यामुळं अकोल्यातील लोक हरीश अलीमचंदानी यांच्याबाबत गंभीरपणे विचारात पडले आहेत. हरीश अलीमचंदानी यांचा असाही चेहरा असू शकतो, हे लोकांना आतापर्यंत ठाऊकच नव्हते.
हरीश अलीमचंदानी हे यापूर्वी अकोल्याचे नगराध्यक्ष होते. अकोल्यातील सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नव्हते. ऐन उत्सवाचा काळ होता. कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत होते. संप झाला असता तर अकोल्यातील सफाईवर परिणाम झाला असता. अशा परिस्थितीत हरीश अलीमचंदानी यांनी आपल्या खिशातून सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन दिले होते. त्यामुळं अकोल्यातील संप टळला होता. सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी धावून गेलेले अलीमचंदानी हे साऱ्यांनीच पाहिले. परंतु ऐन निवडणूक प्रचारात एका महिलेनं अलीमचंदानी यांचा असा एक चेहरा पुढं आणला जो फारच कमी लोकांना ठाऊक होता. सध्या त्याचीच चर्चा जोरात सुरू आहे.
ढसाढसा रडली महिला
माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदा यांना अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमदेवारी दिली जाणार होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तशी ‘स्ट्राँग शिफारस’ भाजपकडे केली होती. मात्र अखेरच्या क्षणी सगळं काही अनुकूल असताना अलीमचंदानी यांचा पत्ता कापण्यात आला. त्यामुळं त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. अलीमचंदानी यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अलीमचंदानी ‘मिस्टर इंडिया’प्रमाणे गायब झालेत.
अलीमचंदानी यांनी समजाविण्याचे अनेक प्रयत्न भाजपने केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास विक्की कुकरेजा स्वत: अकोल्यात येऊन गेले. महापौरपद, शहराध्यक्षपद अशा सगळ्या ऑफर देऊन झाल्या. जीएसटी, ईडी, सीबीआय, राज्य उत्पादन शुक्ल विभाग अस्तित्वात आहे, हे सांगूनही झालं. पण अलीमचंदानी काही मागे हटले नाही. नरेंद्र मोदी हे अलीमचंदानी यांची समजूत काढणार होते. मोदींच्या टीममधून एका महिलेने अलीमचंदानी यांच्याशी संपर्कही केला होता. परंतु काहींनी हा योग जुळून येऊ दिला नाही. आता प्रचार अंतिम टप्प्यात असताना अचानक एक महिला गर्दीतून पुढं आली आणि अलीमचंदानी यांच्यापुढं ढसाढसा रडायला लागली. त्यामुळं अलीमचंदानी यांच्यासोबत असलेल्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Assembly Elections: 105 वर्षांच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क!
असा झाला उलगडा
हरीश अलीमचंदानी यांच्या मुलाला थॅलेसेमिया नावाचा आजार होता. या आजारानंच अलीमचंदानी यांच्यापासून त्यांचा मुलगा हिरावून घेतला. पुत्रवियोगानं व्यथित झालेल्या अलीमचंदानी यांनी मग अकोल्यात थॅलेसेमिया सोसायटी सुरू केली. त्यातून ते थॅलेसेमियाग्रस्तांना उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रचारात जी महिला अलीमचंदानी आणि लोकांसमोर रडली ती याच कारणानं अलीमचंदानी यांच्या संपर्कात आली. या महिलेच्या मुलाला थॅलेसेमिया होता. उपचारासाठी प्रचंड खर्च येणार होता. परिस्थिती बेताची असल्यानं ही महिला वणवण फिरत होती. अशातच अलीमचंदानी यांनी यांनी या महिलेच्या मुलासाठी तब्बल 15 लाख रुपयांचा निधी दिली. या निधीतून थॅलेसेमियाग्रस्त मुलाचा बोनमॅरो बदलण्यात आला. हिच महिला प्रचारादरम्यान एका वस्तीत अलीमचंदानी यांच्यापुढं आली.
‘हरीशभाई माझा मुलगा आणि कुटुंबी जीवंत आहे ते तुमच्या उपकारामुळंच’ अस म्हणत ही महिला अक्षरश: ढसाढसा रडली. प्रचारात सहभागी काही महिलांनी तिला शांत केले. ‘मैने क्या किया? करने वाला और करवाने वाला तो वो उपर बैठा है’ असं अलीमचंदानी यांनी या महिलेला सांगितलं. ’आता सगळं ठिक आहे ना?’ असा प्रश्नही त्यांनी महिलेला केला? महिलेनं होकारार्थी मान डोलावली. डोळं पुसले. प्रचारादरम्यान अनेकांसमोर घडलेल्या या प्रकारानं हरीश अलीमचंदानी यांचा तो चेहरा उघड झाला, ज्यात प्रत्येक थॅलेसेमियाग्रस्तात त्यांना त्यांचा मुलगाच दिसतो. आपल्या मुलासाठी तर आपण काही नाही करू शकलो, पण थॅलेसेमिया सोसायटीच्या माध्यमातून आपण अनेकांना मदत तर करू शकतो, ही त्यांचा प्रामाणिक प्रयत्न या घटनेमुळं अकोलेकरांच्या समोर आला.
निवडणूक, राजकारण, व्यापार, समाज हे संगळं बाजूला ठेवलं तर हरीश अलीमचंदानी एक माणूस म्हणून खरंच चांगला व्यक्ती आहे, असंच या घटनेतून दिसून येतं. अकोला पश्चिमची निवडणूक हरीश अलीमचंदानी जिंकतील की नाही हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. पण नगराध्यक्ष असताना सफाई कामगारांना स्वत:च्या खिशातून वेतन देणे, थॅलेसेमियाग्रस्तांसाठी मदतीला धावून जाणे, यातून अलीमचंदानी यांनी अनेकांची मनं मात्र जिंकली आहेत, यात दुमतच नाही.