Priyanka Gandhi : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचा रविवार, १७ नोव्हेंबर रोजी विदर्भात प्रचाराचा झंझावात राहणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे त्यांची जाहीर सभा होईल. तर नागपूर शहर व जिल्ह्यातील काँग्रेस-महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पश्चिम नागपुरातील अवस्थी नगर चौक येथे आयोजित ‘रोड शो’मध्ये त्या सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांचा रोड शो गेल्या आठवड्यात होणार होता, अशी चर्चा होती.
त्यांचा नागपुरात पहिल्यांदाच ‘रोड शो’ होत आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहात आहेत. जिल्ह्यातील बाराही मतदारसंघातील उमेदवार व समर्थक सहभागी होणार असल्यामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी यांच्या या दौऱ्यामुळे काँग्रेसजणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नागपूर शहर व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी पश्चिम नागपुरातील अवस्थी नगर चौकापासून प्रियंका गांधी यांचा ‘रोड शो’ आयोजित करण्यात आला आहे. या रोड शोमध्ये दुपारी ३.४५ वाजता त्या सहभागी होतील. सायंकाळी ६ वाजता त्या विशेष विमानाने दिल्लीसाठी रवाना होतील.
या रोड शो मुळे पश्चिम नागपुरचे उमेदवार विकास ठाकरे यांचे समर्थक विशेष उत्साहात आहेत. ठाकरे यांच्याकडून आतापर्यंत एकहाती प्रचार सुरू होता. मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रियंका गांधीच येत असल्याने त्यांना बळ मिळणार असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.
प्रियंका गांधी यांचे रविवारी सकाळी ११.२५ वाजता विशेष विमानाने दिल्लीहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर आगमन होईल. सकाळी ११.३० वाजता त्या तेथूनच हेलिकॉप्टरने गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे रवाना होतील. वडसा देसाईगंज येथे आयोजित जाहीर सभेत त्या मार्गदर्शन करतील. ही सभा आटोपून त्या दुपारी २ वाजता नागपूर विमानतळावर पोहचतील.
राहुल यांचा ‘रोड शो’ झालाच नाही
राहुल गांधी विदर्भाच्या दौऱ्यावर असताना नागपुरात संविधान संमेलनात सहभागी झाले. यावेळी त्यांनी दीक्षाभूमिलाही भेट दिली होती. मात्र राहुल यांच्याकडे नागपुरात रोड शो करण्याची गळ घालण्यात आली होती. वेळापत्रकात हा रोड शो बसत नव्हता. पण तरीही एक तास का होईना राहुल यांनी नागपुरात रोड शो करावा, यासाठी काँग्रेस नेत्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, संविधान संमेलनानंतर राहुल गांधी थेट दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे भावाचा रोड शो राहून गेला होता, तो आता बहीण पूर्ण करणार आहे.