Assembly Election : विधानसभा निवडणुकीत भाजपनं हिंदुत्वाचं कार्ड वर काढलं आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार या प्रचारापासून अलित्प आहेत. ‘बटेंगे तो कटेंगे’चा प्रचार राज्यभरात भाजपकडून करण्यात येत आहे. यापासून अजित पवार यांच्या प्रचारातील मुद्दे बरेच वेगळे दिसत आहेत. महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’ अजिबात चालणार नाही. ते तिकडे उत्तर भारतात चालेल. महाराष्ट्र हा साधू संतांचा प्रदेश आहे. शिवप्रेमींचा महाराष्ट्र आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्यांचीच शिकवण आमच्या रक्तात भिनलेली आहे. त्यामुळे आम्ही त्याच रस्त्याने पुढे जाणार, असं अजित पवार म्हणाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’ची हाक दिली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘एक है तो सेफ है’चा नारा दिला आहे. या दोन्ही नाऱ्यांमु्ळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघत असताना अजित पवारांनी त्यापासून स्वतःला व स्वतःच्या पक्षाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार यांची बीडमध्ये प्रचारसभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘बटेंगे तो कटेंगे’ या भूमिकेशी कोणताही संबंध नसल्याचे ठणकावून सांगितले.
वेगळा प्रचार
लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाने वेगळा निर्णय घेतला. त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. पण असे करून त्यांनी काय मिळवले. शिवसेनेने वक्फ बोर्डाचा विषय आला तेव्हा सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. काय साध्य झाले? ज्यांना तुम्ही मते दिली तेच बहिष्कार टाकून गेले, याचा काहीतरी विचार करा, असं पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलण्याचा चुकीचा नरेटिव्ह पसरवला. आरक्षण रद्द करण्याची अफवा पसरवली. यात काहीच तथ्य नव्हतं. आम्ही न्यायदेवेच्या डोळ्यांवरील पट्टी काढून तिच्या हातात तराजू व संविधान दिले. एवढा संविधानाचा आदर आम्ही करतो, असं अजित पवार म्हणाले.
Chandrashekhar Azad : योगींना स्वत:चा प्रदेश सांभाळता येत नाही
भारतात पाकिस्तान व बांगलादेशासारखे उठाव होत नाहीत. जे युक्रेन व रशियात सुरू आहे तसेही भारतात घडत नाही. आमचा पक्ष पुरोगामी विचारांचा आहे. आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे लोक आहोत. या विचारांवर महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आमच्या सरकारने दीड वर्षात अल्पसंख्याकांसाठी जितके निर्णय घेतले, तितके निर्णय आजवर कोणी घेतले नाहीत. या निर्णयांमध्ये आम्ही तिन्ही पक्ष सहभागी आहोत, असं पवार यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची व काँग्रेसची विचारधारा भिन्न आहे. विचारधारा वेगळ्या असल्या तरी युती-आघाडीचा किमान समान कार्यक्रम तयार केलेला असतो. त्यावर सरकार चालत असतं. राज्याच्या व जनतेच्या भल्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात अडीच वर्षे तशा तडजोडी केल्या आहेत, असंही पवार म्हणाले.