Saoner constituency : सुनील केदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. सावनेरचे पाच टर्मचे आमदार आहेत. राज्यात मंत्रीही होते. त्यांना आता काही पक्षात कमवायचे नाही. सावनेरच्या जागेवर आता त्यांच्या अर्धांगिनी उभ्या आहेत. त्यामुळे उद्या पक्ष सत्तेत आला तर केदारांसाठी परिषदेत जागा निर्माण केली जाईल आणि त्यांना मंत्रीमंडळात घेतले जाईल. एवढं त्यांचं वजन आहे. त्यांना कारवाईची देखीस भीती नाही. त्यामुळेच ते राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीला पाठबळ देत आहेत. पण, हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाही. केदारांच्या या ‘बंडा’ला हायकमांडचाच पाठिंबा असल्याची चर्चा आता होत आहे.
मुळक, जिचकार यांच्यासह 27 बंडखोरांवर काँग्रेसने कारवाई केली. त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. पण तरीही राजेंद्र मुळक यांच्या पाठिशी सुनील केदार खंबीरपणे उभे आहेत. अनेकांनी नाना पटोलेंसह राज्यातील सर्व मोठ्या नेत्यांकडे तक्रारी केल्या. पण केदार हटले नाहीत. आता तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विशाल बरबटे यांनी केदारांना थेट अंगावर घेतले आहे. केदारांनी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली, असा थेट आरोप बरबटे यांनी केला आहे.
रामटेक
रामटेक लोकसभा मतदारसंघ अनेक वर्षे शिवसेनेकडे आहे. अशात महाविकास आघाडीत तो ठाकरे गटालाच मिळायला हवा असा आग्रह धरण्यात आला होता. पण केदारांची मागणी मान्य करून ठाकरेंनी हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला आणि त्या मोबदल्यात विधानसभा मागितली. त्यानुसारच घडले. मग आता केदारांनी काँग्रेसच्या बंडखोर नेत्याला समर्थन देऊन आघाडीधर्माची ऐशीतैशी केली आहे, असा आरोप बरबटे यांनी केला आहे.
सुनील केदार हे त्यांच्या खमक्या स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी एवढ्या उघडपणे मुळक यांना पाठिंबा देणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग असू शकतो, असेही बोलले जाते. पण, आपल्या अशा वागण्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होऊ शकतो, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे केदार यांच्या या कृतीला राज्यातील नेत्यांचा आणि हायकमांडचा पूर्ण पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसला सिद्ध करायचे आहे
महाविकास आघाडीत छोटा भाऊ-मोठा भाऊ यावर कायम चर्चा होत असते. शिवसेनेकडे जास्त जागा असल्यामुळे ते आपणच मोठा भाऊ असल्याचे सांगतात. लोकसभेत मात्र काँग्रेसने दणकेबाज कामगिरी केली. त्यामुळे विधानसभेतही जास्त जागा जिंकून आपणच मोठा भाऊ असल्याचे काँग्रेसला सिद्ध करून द्यायचे आहे. त्यातूनच मुख्यमंत्रीपदावरही काँग्रेस दावा करेल. केदारांना पाठबळ देण्यामागे देखील असेच गणीत असल्याचे बोलले जात आहे.