Tough Fight To Congress : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील राजकीय युद्ध आता रंगतदार होऊ लागलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नीकटवर्तीय सहकाऱ्याला फोडत भाजपनं एक पायरी वरची गाठली आहे. मिश्रा यांचे हे समर्थक आहेत, नितीन ताकवाले. मिश्रा यांनीच त्यांना शिवसेनेत आणलं. मिश्रा आणि ताकवाले यांचं समीकरण शिवसेनेत आगळंवेगळंच होतं. परंतु भाजपनं ताकवाले यांना आपल्यासोबत घेतलं आहे. याशिवाय बबलू चोपडे हे देखील भाजपसोबत आले आहेत. त्यामुळे ताकवाले आणि चोपडे यांचा फायदा भाजपला नक्कीच होणार आहे.
ताकवाले हे भावसार समाजातील आहेत. भावसार समाजात त्यांचं बऱ्यापैकी वजन आहे. चोपडे यांच्यामुळं तेली समाज भाजपकडं झुकणार आहे. यापूर्वीही तेली समाजाचं मतदान भाजपला होत होतं. पारंपरिक पद्धतीनं हे मतदान भाजपलाच होणार असल्याचं चित्र आहे. एखाद्या देशाच्या ‘बॉर्डर’वर राहणाऱ्या नागरिकांना जसा त्रास होतो, तसाच काहीसा त्रास भावसार आणि तेली समाजातील अनेक घरांना सहन करावा लागतो. हा त्रास कोणता असेल हे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाबाबत वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही.
फायदाच होणार
नितीन ताकवाले आणि बबलू चोपडे हे ऐन निवडणुकीपूर्वी भाजपसोबत आल्यानं त्याचा फायदा अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपलाच होणार आहे. ताकवाले यांनी मतदानाच्या काही दिवसांपूर्वी मिश्रा यांना सोडले आहे. त्यामुळे मतांचा हा खड्डा शिवसेनेला सहन करावा लागणार आहे. प्रचाराच्या रणधुमाळीचा विचार केला तर अकोल्यात सध्या ‘टफ फाइट’ सुरू आहे. काँग्रेसचे साजिद खान पठाण, भाजपचे विजय अग्रवाल, अपक्ष उमेदवार हरीश अलीमचंदानी, अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा अशा क्रमानुसार सध्या उमेदवारांची नावं घेतली जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अकोल्यात सभा घेतल्यानंतर वातावरण निर्मिती झाली आहे.
काँग्रेसचे प्लॅनिंग
योगी यांच्या सभेनंतर आता काँग्रेस आपले एक एक हत्यार बाहेर काढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या सभेपर्यंत शांत राहण्याची सूचना काँग्रेसनं सर्वांना दिली होती. आता भाजपच्या सभांचा धडाका जवळपास संपला आहे. नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी बऱ्यापैकी तोफगोळे सोडले आहेत. आता ‘बॉर्डर’ पलीकडून हल्ला सुरू होणार आहे. यात शिवसेना उद्धव ठाकरे गट हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विजय अग्रवाल यांना लक्ष्य करीत आहे. शिवसेना अद्यापही टिपू सुलतान या एकाच नावाभोवती घुटमळली आहे. योगी यांच्या सभेनंतर शिवसेनेकडून याच मुद्द्यावरील पोस्ट व्हायरल करण्यास सुरुवात झाली आहे. या सगळ्या माऱ्यात अकोला पश्चिमचे मतदार कोणाची नाव तारतात याचा फैसला लवकरच होणार आहे.