Umarkhed Public Meeting : विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव दिसत आहे. त्यामुळे भाजप हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करीत आहे. भाजपाचे नेते भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांच्याबद्दल बोलत नाहीत. ‘बटेंगे तो कटेंगे, ‘एक हैं तो सेफ हैं’च्या घोषणा देऊन जनतेची दिशाभूल केली जात आहे. त्याला बळी पडू नका. जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजपला सत्तेतून खाली खेचा, असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केलं.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड महागाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. पटोले पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार केला. त्यावेळी त्यांनी यवतमाळमध्ये ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, असं वचन दिलं. शेतमालाला हमीभाव देऊ असं वचन दिलं. सत्तेत आल्यानंतर पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाइलवर करेल, असा शब्द त्यांनी दिला. पण हे काहीच केलं नाही.
केवळ जुमलेबाजी
नरेंद्र मोदींनी यांनी केवळ जुमलेबाजी केली. शेतकऱ्यांचा त्यांनी विश्वासघात केला. आता देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांच्यासारखेच शेतकऱ्यांना आश्वासन देत सुटले आहेत. सत्तेत आलो तर शेतमालाला हमीभाव देण्याची भाषा ते करीत आहेत. 11 वर्षांपासून केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. गेली साडेसात वर्ष देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत. याकाळात त्यांनी काय केलं, हे त्यांनी आधी सांगावं. बळीराजाला खोटी आश्वासनं दिली गेली. यातून ही सगळी मंडळी शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक करू नका. आता शेतकरी भाजपच्या या थापांना बळी पडणार नाही, असं पटोले म्हणाले.
विधानसभेची निवडणूक यंदा अत्यंत महत्वाची आहे. महायुती सरकारनं महाराष्ट्राला संकटात लोटले आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे यासाठी कारणीभूत आहेत. त्यांनी दिल्लीत बसलेल्या मोदी, शाह यांना महाराष्ट्र लुटून देण्याचं पाप केलं आहे. महाराष्ट्र गुजरातकडे गहाण ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही सरकारनं भ्रष्टाचार केला. छत्रपती शिवाजी महाराज व कोट्यवधी शिवप्रेमींचा अपमान केला, असं पटोले म्हणाले.
Shivani Wadettiwar : किर्रर्र अंधार, मोबाइल टॉर्चचा प्रकाश अन् वडेट्टीवार यांची शिवीगाळ
असा अपमान..
भाजपच्या नेत्याने यवतमाळ जिल्ह्यातील वणीमध्ये कुणबी समाजाचा कुत्रे म्हणून अपमान केला. अशा मनुवादी प्रवृत्तींना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्राला महाविकास आघाडी स्थिरता देऊ शकते. महायुती सरकार केवळ धनाढ्यांची घरं भरत आहे. सामान्यांच्या हितासाठी सरकारनं काहीही केलेलं नाही. काँग्रेसनं स्वातंत्र्यापासून देशाचा विकास केला. मोदी-शाह यांनी मात्र देशात हुकुमशाही आणल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली.