केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर मत व्यक्त करण्याचे सहसा टाळतात. त्यांना जेव्हाजेव्हा विचारले गेले तेव्हा त्यांनी उडवूनच लावले आहे. ‘नागपूरहून दिल्लीसाठी थेट विमान आहे. त्यामुळे मला मुंबईत जायची गरज पडत नाही’, असं खास त्यांच्या शैलीतील उत्तर ते देतात. मात्र आज (सोमवार) त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केलं. त्यासाठी त्यांनी एका चित्रपटाचे उदाहरणही दिले.
काटोल येथे भाजप-महायुतीचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचारार्थ त्यांची सभा होती. यावेळी बोलताना त्यांनी पूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्याचवेळी नेत्यांच्या मुलांनी तिकीट मागण्याच्या मुद्यावरही भाष्य केले. मात्र मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत भाष्य करून गडकरींनी सर्वांचं लक्ष वेधलं.
ते म्हणाले, ‘एका वाहिनीच्या मुलाखतीत मला विचारले की ‘महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावरून खूप चर्चा सुरू आहे. त्यावर तुमचं मत काय आहे?’. मी त्यांना ‘थांब टकल्या भांग पाडते’ या चित्रपटाचं उदाहरण दिलं. त्या चित्रपटात एक नट असतो. त्याच्या डोक्यावर केसं नसतात. तो सतत डोक्यावरून कंगवा फिरवत असतो. आता केस नसलेल्या डोक्यावरून कंगवा फिरवून काय उपयोग आहे? सध्या महाराष्ट्रात अशीच परिस्थिती आहे. असे अनेक लोक केस नसलेल्या डोक्यावरून कंगवा फिरवत आहेत.’ गडकरींनी दिलेले उदाहरण ऐकून जोरदार हशा पिकला. त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राची जनता ठरवेल, असेही ठासून सांगितले.
Akola BJP : महापौर झाल्यानंतर अग्रवाल यांनी टिपू सुलतानचे नाव का हटविले नाही?
काटोल ते वरूड पुलाकरिता दीडशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नागपूर ते काटोल या रस्त्यावर १४ ठिकाणी दीडशे कोटी रुपये जास्तीचे खर्च करून अंडरपास बांधण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. कळमेश्वरला गेल्यानंतर सावनेर ते गोंडखैरी हा चारपदरी रस्ता उत्तम झाला आहे. आता नागपूर आणि अमरावतीसाठी पर्यायी मार्ग त्यानिमित्ताने तयार झाला, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. काटोल, नरखेड, वरूड, मोर्शी या सर्व भागांमध्ये पाण्याची पातळी खाली जात आहे. त्यामुळे येत्या काळात जलसंवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात केले जाणार आहे, असेही ते म्हणाले.
‘यापुढे तिकीट मिळणार नाही’
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे चरणसिंग ठाकूर यांना तिकीट देण्याचा मी आग्रह केला. ते दोनदा पराभूत झाले आहेत. खरे तर त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. ते गोरगरिबांची सेवा करतात. शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव आहे. त्यामुळे यावेळी ते नक्की निवडून येतील असा मला विश्वास आहे, असं गडकरी म्हणाले. तोच मंचावरून बावनकुळेंनी ‘आता निवडून आले नाहीत तर तिकीट मिळणार नाही. ही शेवटची संधी आहे’, अशी जोड दिली. त्यानंतर ठाकूर यांचा चेहरा पडलेला होता.