Tipu Sultan Issue : अकोला महापालिकेच्या सभागृहाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यात आपला कोणताही हात नाही, असा दावा करणारी मुलाखत भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी दिली आहे. या मुलाखतीत करण्यात आलेला दावा धादांत खोटा असल्याचा आरोप भाजपमधील अनेक नेते, पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी आता केला आहे. कोणताही ठराव आल्यानंतर सभेत सूचक आणि अनुमोदकाचे नाव जाहीरपणे वाचले जाते. टिपू सुलतान यांचे नाव देण्याबाबत विजय अग्रवाल यांचे नाव कुणीतरी बनावट करून लिहिलं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सभागृहात हा मुद्दा आल्यानंतर विजय अग्रवाल यांनी त्याच क्षणी आपण हा ठरावच दिला नसल्याचं का सांगितलं नाही, असा प्रश्न भाजपच्या सर्वच नेत्यांनी उपस्थित केला आहे.
टिपू सुलतान यांचे नाव सभागृहाला देऊन झाल्यानंतर अलीकडे विजय अग्रवाल हे महापौर झाले होते. खरच त्यांचं हिंदुत्व प्रामाणिक असतं, तर त्यांनी महापौर पदाच्या स्वत:च्या कार्यकाळात टिपू सुलनाचे नाव हटविण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत का घेतला नाही, असा प्रश्न भाजपकडूनच विचारला जात आहे. महापौर असताना विजय अग्रवाल यांना प्रचंड अधिकार होते. आजही अकोला महापालिकेत कोणतंही काम करायचं असलं तरी विरोधी पक्षातील नगरसेवकही विजय अग्रवाल यांच्याकडेच जातात. त्यामुळे विजय अग्रवाल यांच्यासाठी टिपू सुलतान याचं नाव सभागृहावरून हटविणं चुटकी वाजविण्यासारखं होतं. पण भाजपची महापालिकेवर सत्ता असतानाही हे नाव का हटलं नाही, असं भाजपचे सगळेच माजी नगरसेवक विचारत आहेत. विजय अग्रवाल हे खोटारडे आहेत. त्यामुळं भाजपचा एकही माजी नगसेवक त्यांच्यासोबत नसल्याचं प्रत्येकाचं म्हणणं आहे.
अंगलट आलं म्हणून?
टिपू सुलतान यांचं नाव अकोला महापालिकेच्या सभागृहाला देण्यात आलं. हे नाव काही अगदी दोन ते तीन दिवसांपूर्वी देण्यात आलेलं नाही. टिपू सुलतानच्या मुद्द्यावर आतापर्यंत विजय अग्रवाल यांनी अकोल्यात तीव्र आंदोलन का छेडलं नाही. धरणे, मोर्च, सत्याग्रह, उपोषण असं करून टिपू सुलतान यांचं नाव काढायला का लावलं नाही, असा प्रश्न आता खुद्द भाजपच त्यांना विचारत आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप अकोल्यात निवडणूक लढत आहे. मात्र टिपू सुलतानचा मुद्दा अंगलट आल्यानंच विजय अग्रवाल आता धादांत खोटं बोलत असल्याचा आरोप भाजपच्या अनेक नेत्यांकडून होत आहे. असं नसतं तर अकोल्यातील अख्खी भाजप विजय अग्रवाल यांच्या पाठिशी या मुद्द्यावर उभी असती, असंही भाजप नेत्यांचं म्हणणं आहे.
Shivani Wadettiwar : किर्रर्र अंधार, मोबाइल टॉर्चचा प्रकाश अन् वडेट्टीवार यांची शिवीगाळ
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर अकोला महापालिकेतील सर्व कागदपत्र तपासणे गरजेचे आहेत. महापालिका बरखास्त झाल्यानंतर अकोला महापालिकेवर अनेक महिन्यांपासून प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. प्रशासक हा थेट राज्य सरकारच्या नियंत्रणात असतो. राज्यात महायुतीचं सरकार आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे. विजय अग्रवाल यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खूप चलती असल्याचं सांगण्यात येतं. बावनकुळे, फडणवीस यांच्यासोबतचे अनेक फोटो विजय अग्रवाल यांच्या समर्थकाकंडून अनेकदा व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सरकारवर दबाव आणून अग्रवाल यांनी आतापर्यंत टिपू सुलतानचे नाव सरकारला का हटवायला लावलं नाही, असा प्रश्नही अकोला भाजपमधील सगळेच विचारत आहेत.
सध्या भाजपमधील हे नेते समोर आलेले नसले, तरी जवळपास सगळेच प्रचारापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर किमान विजय अग्रवाल यांनी तरी बोलू नये, असा संताप अकोला भाजपमधील नेते व्यक्त करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या प्रखर हिंदुत्ववादी नेत्यांना अकोल्यात आणायचं. त्यांना हिंदुत्वाच्या नावानं मतं मागायला लावायची. सत्ता आल्यानंतर टिपू सुलतानला शहिदे आजम म्हणायचं, हे कोणतं हिंदुत्व असल्याचा सवाल भाजपचे जुने, ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते विचारत आहेत. याबाबत भाजपला कोणतीही शंका असेल तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणत्याही नेत्याला यावर थेट खुली चर्चाच घ्यावी, असं आव्हानही भाजपच्या अकोल्यातील सगळ्याच नेत्यांनी दिलं आहे, जे सध्या प्रचारात नाहीत किंवा असून नसल्यासारखे आहेत.