उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे प्रमुख नेते असून 10 वर्षांपासून मुंबईत रुळले आहेत. मात्र असे असले तरी त्यांचे मन मात्र नागपुरातच असते. खुद्द फडणवीस यांनी सार्वजनिक मंचावरून हे कबुल करत राज्यातील अनेक दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्र्यांना जोरदार चिमटा काढला.
एखाद्या पक्षाचे एखादे थोडे मोठे पद आले की मुंबईत आलिशान फ्लॅट तर सहज होऊन जातो. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदावर असूनदेखील फडणवीस यांचे अद्यापही मुंबईत घर झालेले नाही. याच मुद्द्यांवर भाष्य करत त्यांनी अप्रत्यक्षपणे अनेकांवर टीकास्त्र सोडले.
बारासिग्नल परिसरात फडणवीस यांच्या जाहीरसभेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ‘आज मला लोक देवाभाऊ म्हणून प्रेमाने हाक मारतात. आजवरच्या आपल्या कारकीर्दीत मी स्वतःचा विचार केला नाही. स्वतःचा उद्योग उभारला नाही. सातत्याने समाजासाठी काम करीत राहिलो. राज्यात आजवर 20 मुख्यमंत्री झाले; पण त्यापैकी मी एकटा असा माजी मुख्यमंत्री आहे, ज्याचे मुंबईत घर नाही. मला नागपूरकर असल्याचा अभिमान आहे.’
शहरातील झोपडपट्टीवासींना मालकी हक्कांचे पट्टे देण्याची घोषणा काँग्रेसवाले करीत राहिले. त्यांनी काहीच केले नाही. आमचे सरकार आल्यावर या योजनेला चालना दिली दिली. 25 हजार लोकांना मालकी हक्काचे पट्टे दिले गेले. गुजरवाडीच्या खासगी जागेवर मालकी पट्टे देण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. रेल्वेमार्गालगतच्या लोकांना भीती दाखविली जाते आहे; पण आपण स्वतः रेल्वेमंत्र्यांशी बोलून हा प्रश्न मार्गी लावणार असून भीती बाळगण्याची गरज नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.
साथ-साथ पण वेगवेगळे!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या संपूर्ण विदर्भात प्रचार करत आहेत. नागपुरातील सर्व सहा मतदारसंघांमध्ये त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही मतदारसंघाचा समावेश आहे. पण दोघेही एकत्र सभा न घेता वेगवेगळ्या सभा घेत आहेत. त्यामुळे साथ-साथ असले तरीही वेगवेगळे फिरून भाजप-महायुतीच्या उमेदवारांसाठी जोर लावत आहेत.