या लेखातील मतं लेखकाची आहेत. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असं नाही.
War For Mantralay : महाराष्ट्रातील राजकारणावर बरेच जण टीका करताना दिसतात. राज्यातील राजकारण बिघडलं आहे. कोणाचा पायपोस कुणाला राहिलेला नाही. सर्व प्रमुख राजकीय पक्षातील राजकारणात बरीच उलथापालथ झाल्याचे दिसते. बंडखोरी, गटबाजी, पक्षांतर हा प्रकारही नवीन नाही. पक्षशीस्त कोणी मानत नाही. पक्षादेश पाळत नाही. पक्षाविषयी कुणाला फारशी आस्था राहिलेली दिसत नाही. प्रत्येकाला आपले राजकीय भविष्य घडवायचे आहे. संधी देईल, तो पक्ष आपला अशी मनोवृत्ती वाढीस लागली आहे. कोण, कुठे आणि केव्हा जाईल याची हमी कोणताच पक्ष देऊ शकत नाही.
निवडणुकीच्या दरम्यान अशा प्रकारांना उधाण आले असते. वास्तव चित्र आपण बघतच आहोत. स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांनी सध्याच्या राजकारणाला कडू कारल्याची उपमा दिली आहे. नाशिक येथे त्यांच्या पक्ष उमेदवारांच्या प्रचारसभेत त्यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवत सर्व पक्ष नेत्यांवर निशाणा साधला. आज जे राजकारण सुरू आहे असे राजकारण कधीच बघितले नाही. खोके, गद्दारी, बेइमानी असे विचित्र चित्र राजकारणात बघावयास मिळते. केवळ सत्ता प्राप्ती साठी सारे सुरू आहे. महाराष्ट्राची ओळख इतरांना दिशा देणारे राज्य अशी आहे.
ओळख पुसट
महाराष्ट्राची ही ओळख आता पुसट होत चालली आहे. सर्व प्रस्थापितांनी महाराष्ट्र गिळून टाकला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. माझा शिवसेना पक्ष कधीच काँग्रेसशी हातमिळवणी, युती करणार नाही, असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. फक्त खुर्ची मिळवण्यासाठी त्यांच्या मुलाने उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत युती केली. ही गद्दारी नव्हे काय? असा प्रश्नही त्यांनी विचारला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी असल्याचे मुद्द्यावरून काँग्रेसचा त्याग केला होता.
सत्तेसाठी त्यांचा पक्ष पुन्हा काँग्रेससोबत आला. हे सर्व बघीतल्यावर राजकारण कारल्याच्या भाजीसारखे कडू वाटायला लागले आहे, असे छत्रपती संभाजी राजे म्हणाले. छत्रपती संभाजी राजे यांना जरी राजकारण कडू कारल्यासारखे वाटत असले, तरी याच राजकारणातून राजकीय नेते सत्तेसाठीचा गोडवा आणि जीवनाचा गारवा शोधतात, हे कसे विसरून चालेल.
स्वार्थी वृत्ती
राजकीय नेते राजकारणातील सध्याची परिस्थिती ओळखून राजकारण करतात. आता असे राजकारण खेळण्यात ते माहीर झाले आहेत. निर्माण झालेल्या परिस्थितीनुरुप आता सारेच राजकारण करीत आहेत. राजकारणातील समयानुसार झालेले बदल त्यांनी स्वीकारले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर महाराष्ट्राचे व्याकरणच बिघडले असल्याचे वक्तव्य केले आहे. सद्य:स्थिती बघता त्यांच्या वक्तव्यात तथ्य असल्याचे दिसते. स्वार्थी राजकीय खेळात महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाला आहे, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रमुख पक्ष नवनवीन प्रयोग करीत आहेत.
झालं काय?
नेमके काय सुरू आहे, हे समजण्यास मार्ग नाही. भाजपा, दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय खेळात महाराष्ट्राचा विचका केला आहे. महाराष्ट्राचे राजकारण बिघडले आहे. महाराष्ट्राचे व्याकरणच बिघडले असल्याने यापुढे राज्यात काही विचार आणि विचारधारा टिकेल की नाही, अशी सार्थ भीती राज यांनी व्यक्त केली. निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणातील विविध छटा दिसत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये चूरस आहे. अपक्ष, बंडखोर उमेदवार आणि इतर लहान पक्षांनी मोठ्या पक्षांसमोर आव्हान निर्माण केले आहे. मतविभागणीचा मोठा धोका आहे. या स्थितीत स्पष्ट कल कुणीही सा़ंगू शकत नाही.